Advertisement

मुंबईकरांनी रविवारीही दाखवली अल्ट्रा एनर्जी, अल्ट्रा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद


SHARES

रविवारचा दिवस म्हटला की चाकरमान्यांसाठी हक्काच्या सुट्टीचा दिवस. मस्तपैकी उशीरा उठायचं, खायचं-प्यायचं अन् बिछान्यावर पुन्हा लोळत पडायचं. पण नेहमीच अल्ट्रा एनर्जीनं धावणाऱ्या मुंबईला मात्र असं आळसावणं पसंत नाही. दादरच्या शिवाजी पार्क मॅरेथॉन क्लबशी संलग्न काही हौशी धावपटूंनी मुंबईची हीच ओळख एन्कॅश करत १३ ऑगस्टच्या रविवारी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील धावपटूंसोबत एकूण ५०० धावपटू सहभागी झाले होते. त्यापैकी तब्बल ४०० धावपटूंनी पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान वीर सावरकर स्मारक, दादर ते वरळी दूध डेअरी असं मॅरेथॉनचं ११ किमीचं अंतर धावून पूर्ण करत आपल्यातील जबरदस्त स्टॅमिनाचं प्रदर्शन घडवलं. या स्पर्धेचा मीडिया पार्टनर ‘मुंबई लाइव्ह’ होता.

यंदाच्या अल्ट्रा मॅरथॉन स्पर्धेचं हे तिसरंच वर्ष; तरीही मुंबईतील प्रोफेशनल मॅरेथॉनपटू कुठलंही पारितोषिक वा बक्षिसाची रक्कम नसतानाही केवळ आपल्यातील कस आजमावण्यासाठी या स्पर्धेत धावले आणि अल्ट्रा मॅरेथॉनचा दर्जा एका उंचीवर नेऊन ठेवला. स्पर्धेत सहभागी झालेल्या ५०० धावपटूंमध्ये १५० महिला आणि १०० सुरक्षा दलातील धावपटूंचा समावेश् होता. तर ७० वर्षांहून अधिक वयाच्या ३ स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये धावत ‘अभी तो मै जवान हू’ ची झलक समस्त तरूणांना दाखवून दिली. यांत ७८ वर्षांच्या उषा सोमण यांचाही समावेश होता.

प्रसिद्ध मॉडेल आणि ‘आर्यन मॅन’ ही नामांकीत ‘ट्रायथलॉन’ स्पर्धा जिंकणारा मिलिंद सोमण, पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी आणि नेव्हीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चीअरअप करत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. तसेच उत्तम आरोग्यासाठी धावणं किती महत्त्वाचं आहे, याचं महत्त्वही अधोरेखित केलं.



उलटं धावण्याचा पराक्रम

एखाद्या स्पर्धेत सरळ धावतानाही जिथं धावपटूंचा घामटा निघतो. तिथं चक्क उलटं धावत एका धावपटूनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपक कनल असं या मॅरेथॉनपटूचं नाव आहे. १५ ऑगस्टच्या निमित्तानं राष्ट्राला सलाम करताना दीपकनं हाती तिरंगा घेऊन आपल्या कर्तृत्वाचा झेंडाही स्पर्धेत फडकावला. दीपकनं गेल्या वर्षी वसई-विरार हाफ मॅरेथॉन स्पर्धेत उलटं धावत ३.२८.०४ अशी वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती.


स्पर्धकांची विशेष काळजी

अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांच्या तब्येतीची पुरेपूर काळजी आयोजकांनी घेतली होती. शिवाजी पार्क ते वरळी डेअरी या मार्गावर टप्प्याटप्प्यावर मदत केंद्र उभारण्यात आली होती. तेथे स्पर्धकांना ग्लुकोज, पाणी, खजूर, काजूचे वाटप करण्यात येत होते. एकूण १०० डॉक्टरांची टीमही स्पर्धकांसाठी या केंद्रावर तैनात करण्यात आली होती.


मॅरेथॉन मावशीने वाटले चॉकलेट्स

शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या सर्वांच्या लाडक्या ७३ वर्षांच्या ‘मॅरेथॉन मावशी’ अर्थात ज्योत्सा संझगिरी यांनी दरवर्षीप्रमाणे स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धकांना चॉकलेट्स वाटून त्यांचा उत्साह वाढवला. उत्तम आरोग्याचा संदेश देण्यासाठी त्या दरवर्षी स्पर्धकांना ज्यूस, पाणी किंवा गोड पदार्थ वाटतात. त्यामुळेच शिवाजी पार्क येथील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये त्या ‘मॅरेथॉन मावशी’ म्हणून प्रसिद्ध आहेत.



६१ वर्षीय अंध धावपटूची चमक

अमरजीत चावला या ६१ वर्षांच्या अंध धावपटूने स्पर्धेत सहभागी होऊन आपल्यातील जिद्दीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. चावला यांनी आतापर्यंत ७० हाफ मॅरेथॉन, ४५ किमीच्या १० मॅरेथॉन आणि ३ अल्ट्रा मॅरथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरुवात केली होती.
विशेष म्हणजे अमरजीत यांच्या नावे चीनमधील १९८०० फूट उंचीचे डोलमापास शिखर सर करणारे पहिले भारतीय अशा विश्वविक्रमाचीही नोंद आहे. आपल्या अचाट कामगिरीने त्यांनी अंध असूनही चोख फिटनेसचा मार्ग नव्या पिढीला दाखवून दिला आहे. १०१ मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याचा अमरजीत यांचा मानस आहे.


दिव्यांग स्पर्धकाचाही सहभाग

बिना सल्ला या दिव्यांग महिलेनेही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनाथ, लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या घरकूल संस्थेच्या वतीने सल्ला या स्पर्धेत धावली. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मेहनत घेणाऱ्या तिच्या कार्याला सर्वांनीच सलाम ठोकला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा