Advertisement

बिग बींच्या आठवणीतले बाळासाहेब


बिग बींच्या आठवणीतले बाळासाहेब
SHARES

महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावरून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर मुंबईत एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासोबतच अमिताभ बच्चन यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या वेळी अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.


"माझं आणि बाळासाहेबांचं अनोखं नातं "

माझं आणि बाळासाहेबांचं फार वैयक्तिक नातं आहे. प्रत्येक कार्यक्रमात मला ते बोलवायचे. त्यांनी बोलावलं की मी हजर असायचो. आज देखील मला या कार्यक्रमात बोलावलं, ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. पण बाळासाहेबांचं जीवन तीन तासांत मांडणं हे खरंच खूप कठीण आहे. खरंतर बाळासाहेबांच्या जीवनावर आधारीत वेबसिरीज देखील काढायला हवी. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल.


"बाळासाहेब माझ्या वडिलांसारखे"

बाळासाहेबांना मी जवळपास ४० वर्षांपूर्वी भेटलो होतो. त्यावेळी माझं नुकतंच लग्न झालं होतं. त्यांनी मला घरी बोलावलं आणि सांगितलं, ‘मला तुझ्या बायकोला भेटायचं आहे.’ मी दुसऱ्याच दिवशी जयाला घेऊन त्यांच्या घरी गेलो. बाळासाहेबांच्या कुटुंबियांनी जयाचं जंगी स्वागत केलं. आईंनी (बाळासाहेबांच्या पत्नी) स्वत:च्या सुनेचं करावं, तसं स्वागत जयाचं केलं. त्यामुळे बाळासाहेब मला वडिलांसारखे आहेत.



"त्यांच्यामुळेच आज मी जिवंत"

कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मी जखमी झालो होतो. उपचारासाठी बंगळुरुवरून विमानानं मला मुंबईत आणण्यात आलं. पण विमानतळावरून एकही अॅम्ब्युलन्स मिळत नव्हती. त्यावेळी शिवेसनेची अॅम्ब्युलन्स माझ्या मदतीला धावून आली. त्यामुळेच माझे प्राण वाचले.  


"माझी आणि बाळासाहेबांची शेवटची भेट"

बाळासाहेबांना शेवटच्या क्षणी भेटण्याची संधी मला मिळाली. बाळासाहेबांना अशा अवस्थेत पाहणं सर्वांसाठीच खूप कठिण होतो. माझी देखील परिस्थिती काही वेगळी नव्हती. ते कुणाशीच काही बोलत नव्हते. पण अचानक माझं लक्ष त्यांच्या बेडजवळच्या टेबलावर गेलं. तिथे माझा एक फोटो ठेवला होता. तेव्हा मला जाणीव झाली की मी बाळासाहेब ठाकरेंच्या किती जवळ आहे.  


चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारतोय 'हा' अभिनेता

चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अभिजीत पानसे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.


कधी सुरू होणार शुटिंग?

२०१८ मध्ये मार्च किंवा फेब्रुवारीत चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रीकरण ८० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

असा दिसतोय नवाझुद्दीन बाळासाहेबांच्या लुकमध्ये!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा