Advertisement

दहा बाय दहाच्या खोलीतून थेट इस्त्रोमध्ये! प्रथमेशच्या जिद्दीला यश!

पालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले वडील सोमा आणि आई इंदू यांच्या समवेत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या प्रथमेशने थेट इस्रोमध्ये झेप घेतली आहे.

SHARES

इस्त्रो म्हटलं की कायम संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि रोजच्या रोज नव्या भरारीच्या बातम्या, असंच काहीसं चित्र आपल्यासमोर उभं रहातं. पण सध्या इस्त्रो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलंय. आणि ते आलंय मुंबईच्या पवईमध्ये रहाणाऱ्या प्रशमेश हिरवेमुळे!

प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर काहीही अशक्य नाही. कारण माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो याचा प्रत्यय पवईतल्या २५ वर्षांच्या प्रथमेश हिरवेला भेटल्यानंतर नक्कीच येऊ शकतो. पालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले वडील सोमा आणि आई इंदू यांच्या समवेत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या प्रथमेशने थेट इस्रोमध्ये झेप घेतली आहे.


लहानपणी कळलं, इंजिनिअरींग करू शकणार नाही!

मिलिंद विद्यालयमध्ये मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रथमेशला सुरुवाती पासूनच इंजिनिअरिंगमध्ये आवड होती. प्रथमेश आणि त्याच्या चुलत भावाची कलचाचणी पालकांनी घेतली होती. प्रथमेश इंजिनिअरिंग करू शकत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितल्यावर प्रथमेशच्या ते जिव्हारी लागले आणि आता इंजिनिअर होऊनच दाखवायचे, असा त्याने निश्‍चय केला.


आम्ही प्रथमेशला लहानपासून त्याला ज्याची आवड आहे, ते करण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे तो आज आपल्या आवडीच्या क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर भरारी घेऊ शकला. इतर पालकांनी ही आपल्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे करिअर निवडण्याची संधी देणे, त्यांच्यावर विश्वास दाखवणे आवश्यक आहे.

सोमा हिरवे, प्रथमेशचे वडील


सुरुवातीला इंग्रजी कळेचना!

२००७ साली प्रथमेशने विलेपार्ले येथील भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसाठी प्रवेश मिळविला. मराठीतून शिक्षण घेतलेल्या प्रथमेशला इथले इंग्रजी शिक्षण जड जाऊ लागले. मात्र काही महिन्यांनी त्याने पुढे येऊन इंग्रजीची समस्या बिनधास्तपणे शिक्षकांपुढे मांडली. शिक्षकांनी त्याला डिक्शनरी आणि इंग्रजी पुस्तके वापरण्याचा सल्ला दिला. त्यावर प्रथमेशने मेहनत घेतली व त्याचा मोठा फायदा प्रथमेशला झाला. त्याने डिप्लोमा पूर्ण करून एल एन्ड टी तसेच टाटा पॉवरसारख्या कंपनीमध्ये आपली इंटर्नशिप केली. या वेळी त्याला काही चांगल्या मार्गदर्शकांनी डिग्री शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला.


ओएनजीसी, महाजेनकोला दिला नकार!

पुढच्या टप्प्यात प्रथमेशने नवी मुंबईच्या इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवीही संपादन केली. प्रचंड ,मेहनत आणि सततचा अभ्यास यांच्या जोडीला एकाग्रता प्रथमेशने ढळू दिली नाही. याच दरम्यान त्याने 2016 साली इस्रोमध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्याने यूपीएससीची परीक्षाही दिली होती. परंतु त्याचा ओढा इस्रोकडे होता. दरम्यान ओएनजीसी, महाजेनको, महाट्रांस्को, मेट्रोसारख्या अनेक संस्थांकडून त्याला बोलावणे आले मात्र त्याने त्यास नकार दिला. त्याने पुन्हा मे 2017 मध्ये इस्रोकडेे अर्ज केला आणि अखेर आपले स्वप्न साकार केले.


इस्रोसाठी निवडलं जाणं म्हणजे काय? तिथे नेमकं काय काम करायचं? हे मला माहीत नव्हतं. पण, प्रथमेशच्या बाबांनी मला समजावून सांगितलं, तेव्हा मला माझ्या मुलाचा अभिमान वाटला. त्याने दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला खऱ्या अर्थानं फळ मिळालं.

इंदू हिवरे, प्रथमेशची आई


१६ हजार अर्जांमधून प्रथमेशची निवड!

सध्या सगळीकडे प्रथमेशचे कौतुक सोहळे आणि सत्कार समारंभ पार पडत आहेत. प्रथमेशच्या या कामगिरीबाबत प्रथमेशच्या आईवडिलांना मोठा अभिमान वाटतो आहे. १४ नोव्हेंबर रोजी त्याला इस्रोकडून पत्र आलं आणि दहा वर्षांच्या प्रयत्नांचं सार्थक झाल्याची भावना प्रथमेशच्या मनात दाटून आली. इस्रोकडे आलेल्या १६ हजार अर्जांमधून फक्त नऊ जणांची निवड करण्यात आली आणि या नऊ जणांमध्ये प्रथमेशचा समावेश आहे. काही दिवसातच चंदीगढ येथे तो इस्रोचा इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून रुजू होत आहे. प्रथमेशला इस्रोकडून पत्र येण्याआधी त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना इस्रो म्हणजे नेमकं काय हेही माहीत नव्हते. पण, आता जेव्हा ते प्रथमेशकडे पाहतात, तेव्हा त्यांना त्याच्या मेहनतीची आणि कर्तबगारीची जाणीव झाली आहे.


मला दुसऱ्यांसाठी, देशासाठी आणि जगासाठी काहीतरी चांगले करायचे आहे. मला समाज आणि देशाची परिस्थितीमध्ये चांगले बदल घडवायचे आहेत. माझ्यासारख्या इतर मेहनती आणि होतकरू मुलांना यातून काहीतरी शिकता येईल, मला त्यांना मार्गदर्शन करता येईल यात मला आनंद आहे.

प्रथमेश हिरवे


व्हिडिओग्राफर - गणेश रहाटे



हेही वाचा

एचआयव्ही माझा हिरो...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा