
बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला.
बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक (अतिरिक्त भार) तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा यांनी हा अर्थसंकल्प समितीला सादर केला आहे.
या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाची एकूण अंदाजित तूट 1,317.50 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. शिवाय भांडवली खर्चासाठी 647.79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
2027-28 मध्ये बेस्टला एकूण 8,559.06 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी बेस्टचा एकूण खर्च 9,876.56 कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चातील फरकामुळे 1,317.50 कोटी रुपयांची तूट राहणार आहे.
बेस्टच्या परिवहन विभागाला 2027-28 मध्ये 3,551.55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, या विभागाचा अपेक्षित खर्च 5,070.26 कोटी रुपये आहे. त्यामुळे परिवहन विभागाला तब्बल 1,518.71 कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे.
बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातून 5,007.51 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच त्यासाठी 4,806.30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
त्यामुळे विद्युत विभागातून 201.21 कोटी रुपयांचा अधिशेष मिळण्याचा अंदाज आहे. विद्युत विभागाचा हा अधिशेष परिवहन विभागातील तूट काही प्रमाणात भरून काढण्यास मदत करणार आहे.
बेस्टच्या वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यावर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. जुन्या ऊर्जा रोहित्रांची आणि सर्किट ब्रेकर्सची बदली करण्याबरोबरच नवीन विद्युत वितरण उपकेंद्रे उभारण्याचे नियोजन आहे.
2027-28 मध्ये एक 15 एमव्हीए क्षमतेचे 33/11 केव्ही ऊर्जा रोहित्र बदलण्याचे प्रस्तावित आहे. तसेच 150 जुन्या 11/0.415 केव्ही क्षमतेच्या वितरण रोहित्रांची बदली करण्यात येणार आहे.
वीज वितरणाचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी 2027-28 मध्ये 33 केव्हीची 20 किलोमीटर, 11 केव्हीची 30 किलोमीटर आणि 1.1 केव्हीची 100 किलोमीटर नवीन केबल टाकण्याचे नियोजन आहे.
याशिवाय 35 नवीन 11/0.415 केव्ही विद्युत वितरण उपकेंद्रे उभारण्याचे प्रस्तावित आहे.
वीजपुरवठ्यावर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी ADMS लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास तो शोधणे आणि पुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.
यासोबतच Meter Data Management System, मीटरिंग-बिलिंग-वसुली प्रणाली, ERP आणि 24 तास सुरू असलेले कॉल सेंटर यांचा समावेश असलेल्या IT/OT प्रकल्पावरही काम केले जाणार आहे.
बेस्टमध्ये Security Operations Centre अर्थात SOC स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रातून बेस्टच्या नेटवर्कवर सतत नजर ठेवली जाईल.
सायबर हल्ले, संभाव्य धोके आणि नेटवर्कमधील त्रुटी ओळखून त्यावर तातडीने उपाय करण्यास मदत होणार आहे.
तसेच यानंतर माहिती सुरक्षा व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यासाठी ISO 27001 प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही प्रस्तावित आहे.
प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट व्यवस्था अधिक सोपी करण्यासाठी ONDC नेटवर्कच्या माध्यमातून QR कोडवर आधारित मोबाईल तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा 21 एप्रिल 2026 पासून उपलब्ध आहे.
सध्या ‘ONE Ticket’ अॅपच्या माध्यमातून BEST बसचे तिकीट खरेदी करता येते. आगामी काळात Chartr, PhonePe, Paytm, WhatsApp, RedBus, Rapido आणि Namma Yatri यांसारख्या अॅप्सच्या माध्यमातूनही BEST बसचे तिकीट उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
सप्टेंबर 2026 अखेर BESTच्या ताफ्यात 2,834 बसेस होत्या. आगामी काळात आणखी 4,016 बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.
याशिवाय केंद्र सरकारच्या PM E-DRIVE योजनेअंतर्गत 1,500 मिडी बसेस BESTला मिळणार आहेत. तसेच 200 मिडी CNG बसेससाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. भविष्यात BESTचा बस ताफा 10 हजार बसेसपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हेरिटेज आणि Hop-On Hop-Off पर्यटन सेवेसाठी छतविरहित दुमजली बसेस उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
या बसेसच्या माध्यमातून पर्यटकांना मुंबईतील ऐतिहासिक स्थळे, वारसा वास्तू आणि प्रमुख पर्यटनस्थळांचा वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
BESTच्या चालकांचे प्रशिक्षण अधिक आधुनिक करण्यासाठी दिंडोशी प्रशिक्षण केंद्रात बस ड्रायव्हिंग सिम्युलेटर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या सिम्युलेटरच्या मदतीने चालकांना प्रत्यक्ष रस्त्यावर धोका न पत्करता अपघाताची शक्यता ओळखणे, पावसाळ्यात वाहन चालवणे आणि इंधनाची बचत करण्यासारखे प्रशिक्षण देता येणार आहे.
कार्यरत चालकांसाठी नियमित Refresher Training अधिक आधुनिक पद्धतीने देण्याचीही योजना आहे. याशिवाय SaveLIFE Foundationच्या सहकार्याने सुरक्षाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
2027-28 च्या अर्थसंकल्पातून एकीकडे बेस्टच्या परिवहन विभागाची 1,518.71 कोटी रुपयांची मोठी तूट समोर आली असली, तरीबससेवेचा विस्तार, डिजिटल तिकीट व्यवस्था, वीज वितरणाचे आधुनिकीकरण, सायबर सुरक्षा, चालक प्रशिक्षण आणि मुंबई दर्शन सेवा यांसारख्या विविध योजनांवर भर देण्यात आला आहे.
एकूण 1,317.50 कोटी रुपयांची अंदाजित तूट असलेल्या या अर्थसंकल्पात बेस्टच्या सेवा अधिक आधुनिक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तसेच भविष्यात बस ताफा 10 हजारांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा
