Advertisement

मुंबईतील प्रकाश प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

दक्षिण मुंबईचे रहिवासी, आयटी व्यावसायिक आणि खगोल-छायाचित्रकार असलेल्या निलेश देसाई यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली.

मुंबईतील प्रकाश प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
SHARES

मुंबई (mumbai) आणि ठाण्यातील (thane) अति-तीव्रतेचे फ्लडलाइट्स आणि प्रकाशित जाहिरात फलकांमुळे (billboards) निर्माण होणाऱ्या प्रकाश-प्रदूषणाबाबत (light pollution) दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावली आहे.

तसेच, रात्री 11 नंतर निऑन दिवे बंद करण्याबाबतच्या 1998 च्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, अति-कृत्रिम प्रकाशामुळे रहिवाशांच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने असलेल्या निवासी भागांमध्ये या समस्येकडे लक्ष देण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.

दक्षिण मुंबईतील (south mumbai) रहिवासी, आयटी व्यावसायिक आणि खगोल-छायाचित्रकार (ॲस्ट्रोफोटोग्राफर) असलेल्या निलेश देसाई यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

मरीन ड्राइव्हवरील जिमखानांमधील अति-तीव्रतेचे फ्लडलाइट्स आणि प्रकाशित जाहिरात फलकांमुळे प्रचंड चकाकी (glare) निर्माण होते आणि रात्री उशिरापर्यंत रहिवाशांना त्रास होतो, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्राधिकरणांकडे वारंवार तक्रारी करूनही ही समस्या कायम आहे.

अति-प्रकाशामुळे वन्यजीव आणि वनस्पतींवर परिणाम होतो, ऊर्जेचा अपव्यय होतो आणि वाहनचालकांसाठी दृश्यमानतेशी संबंधित धोके निर्माण होऊ शकतात, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकिलांनी रात्री 11 नंतर निऑन दिव्यांच्या वापराबाबत उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारी आणि 21 सप्टेंबर 1998 रोजी दिलेल्या आदेशांचा संदर्भ दिला.

यापूर्वीच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान राज्य सरकारने स्थापन केलेल्या एका समितीने तीव्र प्रकाशामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांकडे लक्ष वेधले होते, असेही नमूद करण्यात आले.

पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 आणि हवा व जलप्रदूषणाशी संबंधित कायद्यांसह विद्यमान कायदे प्रकाश-प्रदूषणाच्या समस्येचे पुरेसे निवारण करत नाहीत, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला आहे.

प्रकाशाची स्वीकार्य पातळी निश्चित करणे, वापराच्या वेळांवर निर्बंध घालणे आणि अति-तीव्रतेचे दिवे वापरणाऱ्या आस्थापनांकडून नियमांचे पालन सुनिश्चित करणे यासाठी एका प्रभावी नियामक आराखड्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

न्यायालयाने राज्य सरकार आणि संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावून चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.



हेही वाचा

2026 मध्ये मुंबईत बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांत घट

टाटा पॉवर मुळशी जलाशयात तरंगत्या सौरऊर्जा तंत्रज्ञान आणणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा