Advertisement

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा घर देऊन सन्मान


वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा घर देऊन सन्मान
SHARES

कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना संघवी पार्श्व समुहातर्फे घर देउन सन्मानित करण्यात आलं आहे. संघवी पार्श्व समुह कंपनीच्या सीमा संघवी वेल्फेअर फाऊंडेशनच्या उपक्रमातंर्गत शुक्रवारी १० ऑगस्टला आटगाव येथे हा कार्यक्रम पार पडला.


समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व

सन २०१५ मध्ये काश्मीरच्या कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. या शौर्याबद्दल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र बहाल करण्यात आलं. पती शहीद झाल्यानंतर स्वाती महाडिक यांनीदेखील लष्करात रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अकरा महिन्यांचं खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून गेल्यावर्षी त्या लेफ्टनंटपदी रुजू झाल्या. देशाची सेवा करून समाजात स्वाती महाडिक यांनी आदर्श निर्माण केल्याबद्दल समूहाकडून त्यांचा गौरव करण्यात आला.


सीमा फाऊंडेशनचं सामाजिक कार्य

संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष रमेश संघवी यांच्या बहीण सीमा संघवी यांच्या स्मरणार्थ सीमा संघवी वेल्फेअर फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. सीमा फाऊंडेशनतर्फे नेहमीच शहीद जवानांच्या मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते. याच उपक्रमाला पुढे नेत, संघवी पार्श्वने आपल्या लोकप्रिय टाऊनशिपमध्ये घर देऊन स्वाती महाडिक यांच्या कार्याला सलाम केला आहे.

लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं आयुष्य सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. त्या जीवनातील सर्व आव्हाने स्वीकारत सच्च्या जवानाप्रमाणे त्या वाटचाल करत आहे. महाडिक ह्या केवळ त्यांच्या मुलांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी आदर्श आहे. त्यांना आटगाव येथील संघवी गोल्डन सिटीत घर देणे, हा त्यांच्या हिमतीचा गौरव करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.
- रमेश संघवी, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, संघवी ग्रुप

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा