बिस्किटाच्या नावाखाली चरसची तस्करी


बिस्किटाच्या नावाखाली चरसची तस्करी
SHARES

पोलिसांनी शहरात अंमली पदार्थ तस्करांची धरपकड सुरू केल्यामुळे आता या तस्करांनी तस्करीसाठी वेगळा मार्ग अवलंबला आहे. गुरुवारी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी)ने अंधेरी येथे केलेल्या कारवाईदरम्यान बिस्किटांच्या पॅकेटमधून चरसची तस्करी होत असल्याचं आढळून आलं. दरम्यान पोलिसांनी तिघांना अटक करत, त्यांच्याजवळून आठ लाख रुपयांचा चरसचा साठा जप्त केला आहे.

मूळचे हिमाचल प्रदेशचे असलेले आरोपी अंधेरीत अंमली पदार्थांचे वितरण करण्यासाठी येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कारावई केली. पोलिसांच्या कारवाईत अंधेरीतील इन्फिनिटी मॉलसमोर एक जीप संशयीत रित्या उभी करण्यात आली होती. त्यामध्ये रवी कुमार(38), सलीम खान(33) आणि अनुप गुप्ता(29) हे तिघे बिस्किटांचे पेकेट एका बॅगमधून दुसऱ्या बॅगमध्ये भरत होते. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला होता. मात्र पॅक बिस्किटे लहान मुलांना वाटण्यासाठी नेत असल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी दुर्लक्ष केलं.


भूकेने अडकले जाळ्यात


दुपारच्या उन्हात त्या तिघांजवळी बिस्किटे पाहून पोलिसांना तोडांला पाणी सुटलं. जवळपास खाण्यासाठी कोणतीही गाडी दिसत नसल्यानं पोलिसांनी भूक भागवण्यासाठी आरोपींजवळल असलेल्या बॅगेतून एक बिस्कीटचा पुडा घेतला. तोच तिन्ही आरोपी पळ काढण्यासाठी धडपडले. पोलिसांनी पुडा उघडताच गडद राखाडी रंगाची चरसची बिस्किटे खाली पडली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली. यातील रवी कुमार हा हिमाचल प्रदेश, खान हा मुंबईतील जोगेश्‍वरी आणि गुप्ता हा अंधेरी पश्‍चिम येथील रहिवासी आहे.

हे ड्रग्ज एका बड्या ड्रग्ज विक्रेत्याला विकण्यासाठी तिघे अंधेरीत आल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समजली आहे. त्याबाबत एनसीबी अधिक तपास करत आहे. याप्रकरणी तिनही आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली महागडी जीप एनसीबीने जप्त केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा