खंडाळ्याच्या जमीनीसाठी लकडावालाने दिली ११ कोटी ५० लाखांची लाच

चौकशीत सर्व व्यवहार ११ कोटी ५० लाख रुपयांना झाल्याचे पुढे आले होते. त्यानुसार या गुन्ह्यातील अनेक पैलू पोलिसांनी उलघडण्यास सुरूवात केल्यानंतर लकडावालाकडून या गुन्ह्यात लाच घेऊन त्याला मदत करणाऱ्यांची यादीच पोलिसांसमोर आली.

खंडाळ्याच्या जमीनीसाठी लकडावालाने दिली ११ कोटी ५० लाखांची लाच
SHARES

खंडाळा येथील चार एकर जमिनीसाठी युसुफ लकडावालाने सरकारी अधिकारी आणि दलालांना तब्बल ११ कोटी ५० लाख रुपयांची लाच दिल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून पुढे आली आहे. याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील अधिकारी विकास ढेकळे आणि दलाल दीपक गुप्ता या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. या गुन्ह्यात अटक आरोपींसह अनेक धक्कादायक खुलासे पुढे येण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.


कागदपत्रे खोटी

खंडाळा येथील मोक्याच्या जागेवर असलेली चार एकर जमीन युसुफ लकडावालाने बनावट कागदपत्रांच्या मदतीने हडप करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच या जमिनीचे कागदपत्रे खोटी असल्याची बाब दुय्यम निबंधक कार्यालयातील जितेंद्र बडगुजर यांच्या लक्षात आली. या प्रकरणी बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार पुढे आला. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच बांधकाम विकासक युसुफ लकडावाला आणि शौकत सय्यद मसहुर घोरी याला अटक केली. या गुन्ह्यांतील अनेक पैलू पोलिसांनी उलघडण्यास सुरूवात केल्यानंतर चौकशीत लकडावालाकडून हा सर्व व्यवहार ११ कोटी ५० लाख रुपयांना झाल्याचे पुढे आले होते. 


कुणाच्या वाट्याला किती पैसे

या गुन्ह्यात लकडावालासह मुख्य सूत्रधाराची भूमिका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी विकास ढेकळेची होती. ११.५० कोटींतील सर्वांत मोठा वाटा म्हणजेच पाच कोटी ढेकळेच्या वाट्याला आले आहेत. बनावट डीडी आणि करारपत्र तयार करून जमीन कशी बळकावता येईल, बनावट कागदपत्रे खरी कशी भासवता येतील, याबाबत ढेकळेने युसूफला यंत्रणेतील पळवाटा सांगितल्या होत्या. तर दलाल गुप्ताला एक आणि घोरीला दीड कोटी रुपये देण्यात आले. आरोपी मोहन नायर याला युसूफकडून या कामासाठी चार कोटी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपी गुप्ताच्या लोणावळा येथील सदनिकेत या व्यवहाराबाबत झालेल्या बैठकांत कट रचण्यात आल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

१९४९ ची कागदपत्रं

आरोपींनी नवाबाच्या मालकीची साडेचार एकर जमीन बळकावण्यासाठी १९४९ सालचे बनावट करारपत्रही बनवले होते. त्याची मुंबई निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. तसेच मावळ दुय्यम निबंधक कार्यालयातील खरी कागदपत्रे गहाळ करण्याचा प्रयत्नही झाला होता. हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत. मात्र या गुन्ह्यातील महत्वाचा आरोपी मोहन नायर अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


हेही वाचा -

लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने ओएलएक्सवर फसवणूक करणारा अटकेत

महामार्गावर बंदुकीच्या धाकावर ट्रक लुटणारे आरोपी अटकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा