दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे.

दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई
SHARES

मुंबई पोलिसांनी दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे. कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. यावरून वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या.

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहेत. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते.

याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याचं वृत्त बुधवारी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या एका टीमने तातडीने दक्षिण मुंबईतल्या बडा कब्रस्तानमधल्या मेमनच्या कबरीची पाहणी केली. आज पुन्हा एलटी मार्गच्या पोलीस पथकाने कब्रस्तानात जाऊन पाहणी केल्यानंतर कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. तर 'शब ए बारात'निमित्त लायटिंग लावली होती, असं तिथल्या ट्रस्टीचं म्हणणं होतं.

भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? असा खोचक सवाल कदम यांनी विचारला आहे.

महाविकासआघाडी सरकारच्या काळात या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी देखील कदम यांनी केला आहे.

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.



हेही वाचा

डबेवाल्यांच्या सायकली चोरीला, डब्बावाला असोसिएशनचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा