Advertisement

IIT बॉम्बेकडून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी 24 तास हेल्पलाईन

वेल्फेअर अ‍ॅप आणि तक्रार निवारण पोर्टलही उभारणार

IIT बॉम्बेकडून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी 24 तास हेल्पलाईन
SHARES

IIT बॉम्बेने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी 24 तास कार्यरत मानसिक आरोग्य सहाय्य यंत्रणा सुरू केली आहे.

विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर संस्थेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अ‍ॅप आणि ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल विकसित करण्याचीही योजना आखण्यात आली आहे.

संस्थेने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दोन मानसोपचारतज्ज्ञ २४ तास उपलब्ध करून दिले आहेत. तसेच समुपदेशक आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असलेली हेल्थ अँड वेल्फेअर रिस्पॉन्स टीम स्थापन करण्यात आली आहे.

मानसिक तणावात असलेल्या किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही टीम कॅम्पसमध्ये कुठेही जाऊन तातडीची मदत देऊ शकणार आहे.

IIT बॉम्बे प्रशासनाने विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे या उपाययोजनांची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना तातडीची मदत हवी असल्यास 8356810252 या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा wellness@iitb.ac.in या ईमेलवर मदत मागता येईल. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत ईमेलऐवजी फोन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उभारण्याची योजना आहे. तसेच वसतिगृह आणि विभागीय स्तरावर विद्यार्थी कल्याण प्रतिनिधी नियुक्त करण्याचाही प्रस्ताव आहे.

शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेकडून विभागीय शैक्षणिक समित्यांच्या (DAC) कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.

परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धतींचीही तपासणी केली जाणार आहे. या प्रक्रियांमध्ये निष्पक्षता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येत आहे.

याशिवाय, वसतिगृहांमधील सामायिक जागा आणि कॅम्पसमधील इतर सुविधांचाही आढावा घेतला जात आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय कमी करण्यासाठी वसतिगृहांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या डिलिव्हरीची सुविधा रात्री २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची स्वतंत्र चौकशीही सुरू आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी, तक्रार निवारण यंत्रणेची सुलभता आणि संस्थेच्या प्रशासकीय निर्णयांमधील पारदर्शकता याबाबत मागण्या करण्यात येत होत्या.

या पार्श्वभूमीवर IIT बॉम्बेने विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.



हेही वाचा

2041 पर्यंत मुंबईसमोर पाणीटंचाईचे संकट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा