मुंबईतील वायुप्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी वरळी येथे सर्वाधिक 164 AQI नोंदवण्यात आला. देवनारमध्ये 154, तर नेव्ही नगर-कोलाबा परिसरात 151 AQI नोंदवण्यात आला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर बांधकामांच्या कामांना वेग आल्याने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी मुंबईचा एकूण AQI 120 नोंदवण्यात आला. गेल्या 48 तासांत हवेच्या गुणवत्तेत 43 अंकांची घसरण झाली आहे. वांद्रे पूर्व येथे 147, माझगाव येथे 142, वांद्रे-कुर्ला संकुलात 130, कुर्ला येथे 128, तर चेंबूरमध्ये 126 AQI नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, मुंबईतील 30 पैकी केवळ 20 हवा गुणवत्ता मापन केंद्रे गुरुवारी कार्यरत होती.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने 2 ऑक्टोबर रोजी ‘वायुप्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणी कृती आराखडा 2026’ जाहीर केला आहे. याअंतर्गत प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान 10 प्रदूषणप्रवण ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. बांधकाम आणि पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधांची कामे, उघड्यावर कचरा जाळण्याची ठिकाणे, बांधकामाचा राडारोडा टाकली जाणारी ठिकाणे तसेच वाहतूक कोंडी होणाऱ्या परिसरांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या 28 मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास काम थांबवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.
पावसाळ्यानंतर रस्त्यांवर साचलेला गाळ, चिखल आणि धूळ हटवण्यासाठी पालिकेकडून ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या भागांच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. धूळ उडू नये यासाठी पुनर्वापर केलेले पाणी आणि पाण्याच्या सूक्ष्म फवाऱ्यांचा वापर केला जाणार आहे.
बांधकाम प्रकल्पांच्या आकारानुसार लगतचे रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी विकासक आणि कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे. 4,000 चौरस मीटरपर्यंतच्या प्रकल्पांना 100 मीटर, 4,000 ते 10,000 चौरस मीटरच्या प्रकल्पांना 200 मीटर, तर 10,000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांना दोन्ही बाजूंचे मिळून संबंधित नियमानुसार 500 मीटरपर्यंतचे रस्ते स्वच्छ ठेवावे लागणार आहेत.
महापालिकेकडून हवेच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असून, प्रदूषणाच्या पातळीनुसार श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती आराखड्याची (GRAP) अंमलबजावणी केली जाईल. एखाद्या हवा गुणवत्ता मापन केंद्रावरील AQI सलग तीन दिवस 300 च्या वर राहिल्यास त्या केंद्राच्या दोन किलोमीटर परिसरातील बांधकामांसह प्रदूषण वाढवणाऱ्या कामांवर बंदी घातली जाऊ शकते.
पावसाळा संपल्यानंतर बांधकामे आणि पुनर्विकास प्रकल्पांना वेग येत असतानाच मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. वरळी, देवनार आणि नेव्ही नगर-कोलाबा हे सर्वाधिक प्रदूषण नोंदवले गेलेले परिसर ठरल्याने, धूळ नियंत्रणासाठी महापालिकेच्या उपाययोजना कितपत प्रभावी ठरतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
हेही वाचा
