Advertisement

Exclusive: म्हाडा तोंडावर आपटलं! परळमधली २९ महागडी घर विजेत्यांनी केली परत

म्हाडाच्या मुंबई मंडळानं १० नोव्हेंबर २०१७ मध्ये ८१९ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत लोअर परळ येथील १ कोटी ९६ लाख ६७ हजार १०३ रुपये किंमतीच्या २ घरांचा तर १ कोटी ४२ लाख ९६ हजार ५१७ रुपये किंमतीच्या ३४ घरांचा समावेश होता. कोटी कोटींची उड्डाणं घेणाऱ्या या घरांच्या किंमतीनं सर्वांचेच डोळे पांढरे केले होते. आता मात्र म्हाडाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

Exclusive: म्हाडा तोंडावर आपटलं! परळमधली २९ महागडी घर विजेत्यांनी केली परत
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०१७ मध्ये काढलेल्या लाॅटरीतील कोटींची उड्डाणे घेणाऱ्या लोअर परळ येथील घरांच्या किंमतीवरून चांगलाच गदारोळ झाला होता. सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून देणारी म्हाडा एवढ्या महागड्या किंमतीत घरं का विकतेय यावरून म्हाडावर प्रचंड टीकाही झाली होती. म्हाडाच्या याच 'गल्लाभरू' निर्णयाचे उलटे पडसाद आता उमटायला लागले असून लोअर परळच्या महागड्या ३६ घरांपैकी चक्क २९ लाॅटरी विजेत्यांनी ही घरं म्हाडाला परत दिल्याची माहिती मुंबई लाइव्हला विश्वसनीय सूत्रांनी दिली. म्हाडासाठी ही मोठी नामुष्कीची बाब म्हणावी लागेल.


डोळे पांढऱ्या करणाऱ्या किंमती

म्हाडाच्या मुंबई मंडळानं १० नोव्हेंबर २०१७ मध्ये ८१९ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत लोअर परळ येथील १ कोटी ९६ लाख ६७ हजार १०३ रुपये किंमतीच्या २ घरांचा तर १ कोटी ४२ लाख ९६ हजार ५१७ रुपये किंमतीच्या ३४ घरांचा समावेश होता. कोटी कोटींची उड्डाणं घेणाऱ्या या घरांच्या किंमतीनं सर्वांचेच डोळे पांढरे केले होते. आता मात्र म्हाडाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.


तुंगाचीही हीच परिस्थिती

इतकंच नव्हे, तर तुंगा पवई येथील, १ कोटी ३९ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या १६८ घरांमधील काही घरंही मोठ्या संख्येनं विजेत्यांनी मुंबई मंडळाला परत केल्याची खात्रीलायक माहिती आहे. उच्च गटातील घरं इतक्या मोठ्या संख्येने परत होण्याची ही कदाचीत पहिलीच वेळ आहे. यामुळं म्हाडावर प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांना घर देण्याची वेळ ओढावली आहे.



मुंबई लाइव्हच्या वृत्ताने खळबळ

लोअर परळमधील ४४.२१ चौ. मी. घराची किंमती १ कोटी ९५ लाख तर ३३.८० चौ. मी. घराची किंमत सव्वा कोटीच्या दरम्यान असेल हे 'मुंबई लाइव्ह'नं ८१९ घरांची जाहिरात प्रसिद्ध होण्याआधीच सांगितलं होतं. 'मुंबई लाइव्ह'च्या यासंबंधीच्या वृत्तानं चांगलीच खळबळ उडाली होती, तर या महागड्या घरांना अर्जदारांकडून म्हणावा तसा प्रतिसादही मिळाला नव्हता. महत्त्वाचं म्हणजे ही घर खासगी बिल्डरांच्या तुलनेत महागडी असल्याची टीकाही त्यावेळी म्हाडावर झाली होती. तर किंमती कमी करण्याचीही मागणी त्यावेळी झाली होती. पण मुंबई मंडळानं मात्र चुप्पी साधत या घरांसाठी सोडत काढलीच.


वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुजोरा

यासंदर्भात मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ३६ पैकी २९ विजेत्यांनी घर परत केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर ही घर परत केल्यानं ही घर प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनं स्पष्ट केलं आहे.


घर परवडलं नाही

माझ्या आईला लोअर परळमधील घर लागलं होतं. पण या घराची किंमत जास्त असल्याने हे घर आम्ही म्हाडाला परत केलं आहे, अशी माहिती लोअर परळमधील लाॅटरी विजेत्या शारदा तंदूर यांचा मुलगा डाॅ. प्रसाद तंदूर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. अशीच प्रतिक्रिया इतर काही विजेत्यांनाही दिली आहे.


प्रतिक्षा यादीवरील विजेतेही अनुत्सुक

पण, प्रतिक्षा यादीवरील विजेतेही ही घरं घेण्यासाठी उत्सुक नसल्याचंही समजतं आहे. एकूणच म्हाडाच्या महागड्या घरांना नाकारलं असून आता यावरून म्हाडाला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रतिक्षा यादीवर विजेत्यांनी ही घरं नाकारली तर ही घरं पुढच्या अर्थात येणाऱ्या लाॅटरीत समाविष्ट करण्याची नामुष्की मुंबई मंडळावर ओढावणार आहे.



हेही वाचा-

स्वप्नांच्या पलिकडले! लोअर परळच्या घराची किंमत २ कोटींवर

खूशखबर... म्हाडाची विरार फास्ट, १९ आॅगस्टला फुटणार ९०१८ घरांची बंपर लाॅटरी

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी ६२५ झाडांचा बळी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा