म्हाडात पैसे घेऊन अभियंत्यांची बदली? गृहनिर्माण विभागाकडून चौकशी

 Mumbai
म्हाडात पैसे घेऊन अभियंत्यांची बदली? गृहनिर्माण विभागाकडून चौकशी

म्हाडातील सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी 'मन की बात' या नावाने एक पत्र आले होते. या पत्रात तत्कालीन म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी 5 कोटी रुपये घेत काही अभियंत्यांना पदोन्नती आणि हव्या त्या पदावर बदली दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. या पत्राने म्हाडात चांगलीच खळबळ उडाली होती. या पत्राची गंभीर दखल गृहनिर्माण विभागाने घेतली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही याप्रकरणी चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

म्हाडा उपाध्यक्ष झेंडे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. पण त्यांनी सेवानिवृत्त होण्याअगोदर 5 कोटी रुपये घेऊन म्हाडातील अभियंत्यांची बदली आणि पदोन्नती केल्याचा आरोप करणारे एक पत्र म्हाडा अधिकाऱ्यांच्या हाती तीन आठवड्यांपूर्वी पडले. डी. जाधव नावाच्या व्यक्तीने हे पत्र पाठवले आहे. या पत्रात झेंडे यांनी कुठल्या अधिकाऱ्यांना बदली आणि पदोन्नती दिली, त्यासाठी किती रुपये घेतले हे नमूद केले आहे. पत्रात व्यक्तीचे पूर्ण नाव वा कोणतीही माहिती नसल्याने म्हाडाचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले. डी. जाधवचा शोधही सुरू झाला. मात्र अद्याप म्हाडाला डी. जाधव सापडलेला नाही.

या प्रकरणाची तक्रार गृहनिर्माण विभागाकडे केल्यानंतर गृहनिर्माण विभागाने त्याची गंभीर दखल घेतली. गेल्या आठवड्यात प्रधान सचिवांनी म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे समजते आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून डी. जाधव नेमका कोण आहे? हे शोधून त्याला सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे प्रधान सचिवांनी सांगितले.


हेही वाचा

संभाजी झेंडे हाजिर होSSS!


त्यानुसार म्हाडाने पत्रात नमूद असलेल्या डी. जाधवच्या पत्त्यावर पत्र पाठवून त्याला मंगळवार 23 मे रोजी सुनावणीसाठी म्हाडात उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याची माहिती म्हाडाचे सचिव डाॅ. बी. एन. बास्टेवाड यांनी दिली. त्यामुळे मंगळवारी डी. जाधव ही व्यक्ती समोर येते का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणात तथ्य आहे का हे समजेल. या अहवालात कोणी दोषी आढळले, तर त्यांच्याविरोधात नक्कीच कारवाई होईल, असेही प्रधान सचिवांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू झाल्याने झेंडे यांच्या अडचणी वाढतील अशी चर्चा सध्या म्हाडात सुरू आहे.

Loading Comments