Advertisement

यारी रोड-लोखंडवाला फ्लायओव्हर डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार


यारी रोड-लोखंडवाला फ्लायओव्हर डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार
SHARES

मुंबईतील यारी रोडला लोखंडवाला बॅक रोडशी जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित फ्लायओव्हरच्या कामाला वेग देण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत. हा फ्लायओव्हर डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी नुकतीच अमरनाथ टॉवरजवळील प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


206 मीटरचा पूल, पूर्व-पश्चिम जोडणीला मिळणार चालना

कवठे खाडीवर यारी रोड-लोखंडवाला बॅक रोडच्या जंक्शनजवळ हा पूल उभारण्यात येत आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात खाडीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला १८.३० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, खाडीमुळे आतापर्यंत हा रस्ते संपर्क पूर्ण होऊ शकला नव्हता.

फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर यारी रोड, पंच मार्ग आणि वर्सोवा हे भाग सरदार वल्लभभाई पटेल नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स आणि समर्थ नगराशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे यारी रोड, वर्सोवा, लोखंडवाला आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

स्टील बास्केट-हँडल आर्चची रचना

या पुलाची एकूण लांबी 206 मीटर असून त्यामध्ये—

  • मुख्य पूल – 110 मीटर

  • सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या बाजूचा अप्रोच रोड – 40 मीटर

  • अमरनाथ टॉवरच्या बाजूचा अप्रोच रोड – 56 मीटर

  • पुलाची एकूण रुंदी – 11 मीटर

मुख्य पुलासाठी 110 मीटर लांबीचा सिंगल-स्पॅन स्टील बास्केट-हँडल आर्च उभारण्यात येणार आहे. स्टीलच्या आर्चला टेन्शन रॉडच्या माध्यमातून पुलाच्या डेकशी जोडण्यात येईल. पुलासाठी आरसीसी अॅबटमेंट वॉल, कॅप्स आणि आरसीसी पाइल फाउंडेशनचा वापर केला जाणार आहे.

30 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांवर येण्याची शक्यता

हा पूल सुरू झाल्यानंतर सध्या सुमारे 30 मिनिटे लागणारा प्रवास 10 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. तसेच यारी रोड, वर्सोवा आणि लोखंडवाला परिसरातील विद्यमान रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन पूर्व-पश्चिम दिशेने आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

भविष्यात वर्सोवा-बांद्रा सी लिंक आणि मुंबई कोस्टल रोडचा उत्तरेकडील विस्तार सुरू झाल्यानंतर हा फ्लायओव्हर या महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा पर्यायी फीडर रूट म्हणूनही उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

200 पासून रखडलेला प्रकल्प

हा प्रकल्प तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रखडलेला आहे. 2002 मध्ये त्याची प्रथम कल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये प्रकल्पाला वेग आला आणि सुमारे 17 कोटी रुपयांच्या खर्चाचा टेंडर काढून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.

मात्र, परिसरातील खारफुटीच्या जमिनीशी संबंधित पर्यावरणीय मुद्दे आणि न्यायालयीन आव्हानांमुळे प्रकल्प रखडला.

2020 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रकल्प पुढे नेण्यास परवानगी दिली. त्यानंतरचे आणखी एक न्यायालयीन आव्हान २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. 2024 मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रकल्पासाठी 0.2105 हेक्टर खारफुटीच्या वनजमिनीचे वळतीकरण करण्यास मंजुरी दिली.

यानंतर महापालिकेने नोव्हेंबर 2023 मध्ये नव्याने निविदा काढली. प्रकल्पाचा खर्च आता सुमारे 42 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने डिसेंबर 2027 पर्यंत हा दीर्घकाळ प्रलंबित फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे.



हेही वाचा

बाणगंगा तलावात शेकडो मासे मृत अवस्थेत आढळले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा