Advertisement

लोकल ट्रेनच्या डब्ब्यातलं अतरंगी 'हंग्री जेडी' हॉटेल!

'लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे', असं आपण अनेकदा बोलतो, ऐकतो. पण 'हंग्री जेडी'च्या ध्वनिल आणि रेवतीने ही लाईफलाईन चक्क वास्तवात उतरवली आहे. बोरिवलीमध्ये य दोघांनी मिळून सुरु केलेलं 'हंग्री जेडी' हॉटेल हे हॉटेल नसून चक्क एक लोकल ट्रेनच वाटतं.

SHARES

टिकट लेकर चढिये, कभी तो सुधरेंगे
अगला स्टेशन कांदिवली, भाईसाब उतरेंगे?

वक्त नहीं लगेगा, खाना आने में
ट्रेन खाली होगी सिर्फ थाने में!

यहाँ के डिशेस खा के माइंड ब्लास्ट हो जायेगा
अंधेरी के बाद ट्रेन फास्ट हो जायेगा!

बोरिवलीच्या 'हंग्री जेडी' हॉटेलमध्ये शिरताच तुम्ही हे असले अतरंगी शेर (थोडक्यात चारोळ्या!) पाहाता आणि 'हे काहीतरी भलतंच आहे' याचा साक्षात्कार तुम्हाला होतो. समोर एसी रूमऐवजी चक्क वेस्टर्न रेल्वेचा एक डबाच बघून नुकत्याच झालेल्या तुमच्या साक्षात्कारावर तुमचा विश्वास बसू लागतो. आणि लोकलच्या त्या डब्यात दोन सीट्सच्या मध्ये मोकळी जागा नसून थेट जेवणाची टेबलं बघून तर तुम्हाला 'अरे हे चाललंय तरी काय?' असा आश्चर्यवजा प्रश्न पडल्यावाचून राहाणार नाही, ही आमची खात्री आहे!

'लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे', असं आपण अनेकदा बोलतो, ऐकतो. पण 'हंग्री जेडी'च्या ध्वनिल आणि रेवतीने ही लाईफलाईन चक्क वास्तवात उतरवली आहे. बोरिवलीमध्ये य दोघांनी मिळून सुरु केलेलं 'हंग्री जेडी' हॉटेल हे हॉटेल नसून चक्क एक लोकल ट्रेनच वाटतं.




घरवाली बोरिवली!

आत गेल्यावर एका बाजूला तुम्हाला मुंबईतल्या वेगवेगळ्या स्टेशन्सची नावं दिसतील. पण ही नावं पण 'मॉडिफाईड' आहेत. म्हणजे, सिनेमाच्या नावासोबत त्यांची नावं जोडण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, घरवाली - बोरिवली, अंधेरी - रात में. भलतंच अतरंगी आहे ना!


'फर्स्ट क्लास'चं हॉटेल!

इथे दोन प्रकारच्या सीटिंग अरेंजमेंट्स करण्यात आल्या आहेत. एक आहे ती ओपन स्पेस. पण तिथेही लोकलचा फील काही सुटत नाही. आजूबाजूला सगळीकडे लोकल स्टेशन्सची नावं लावण्यात आली आहेत. तर समोरच आहे तो लोकलचा फर्स्ट क्लासचा डबा! म्हणजे, जेवणाची एसी रूम. या डब्यातली, म्हणजेच एसी रूममधली रचना ही हुबेहुब लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यासारखी केली आहे. दोन्ही बाजूला कुशनची बाकं आणि मध्ये जेवणाचं टेबल अशी इथे रचना आहे. याव्यतिरिक्त गाड्यांचे व्हील, आंब्याच्या लाकडी पेट्या, सुतळी दोरीला बांधलेले लाईट्स असा फुल्ल 'मुंबईय्या' लुक देण्यात आला आहे.



कॉफी पावभाजी

या अतरंगी हॉटेलमधला सगळ्यात अतरंगी पदार्थ म्हणजे 'कॉफी पावभाजी'! नावाइतकाच हा पदार्थ अतरंगी आहे. नेहमीच्या पावापेक्षा वेगळे असे गोल आकाराचे पाव इथे मिळतात. आणि त्यासोबतची भाजी ही भाजी नसून ती कॉफीच आहे असंच तुम्हाला आधी वाटेल. पण खाल्ल्यानंतरच खरी गंमत कळते.

याशिवाय, रंगीबेरंगी पानीपुरी, चाट मसाला, चायनिज कॉर्नर,मॉकटेलसारखे खाद्यपदार्थांचे स्टॉलही टिपिकल स्टेशन स्टॉलच्या लुकमध्ये तुम्हाला इथे दिसतील.


फक्त शाकाहारी आणि फॅमिली

'हंग्री जेडी'चं वैशिष्ट्य म्हणजे इतर थीम बेस्ड हॉटेलांप्रमाणे इथे मद्यपान किंवा नॉनव्हेज जेवण तुम्हाला मिळणार नाही. ध्वनिल आणि रेवती यांनी खास फॅमिली हॉटेल बनवण्याच्या उद्देशाने इथे मद्यपान ठेवलेच नाही. शिवाय त्यांनी इथे शुद्ध शाकाहारी जेवणच ठेवले आहे.



महिन्याभरात येणार 'बेस्ट'

या लोकल ट्रेनसोबतच 'हंग्री जेडी'मध्ये अवघ्या महिन्याभरात बेस्ट बसही अवतरणार आहे. अर्थात, फर्स्ट क्लासच्या डब्याच्या लुकसारख्या जेवणाच्या रूमसोबतच इथे 'बेस्ट' स्टाईलची रूमही लवकरच बनवण्यात येणार आहे.

शाळेत वर्गमित्र असलेले ध्वनिल शाह आणि रेवती कुलकर्णी यांनी मिळून 'हंग्री जेडी' हे हॉटेल साकारले आहे. ध्वनिल याआधीही मुंबईत फुड ट्रकचा व्यवसाय करत होता. तर रेवती हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होती. मुंबईकरांसाठी काहीतरी भन्नाट आणि तितकंच अतरंगी करण्याच्या हेतूने त्या दोघांनी 'हंग्री जेडी' हॉटेल साकारलं.

त्यामुळे, आता जर तुम्ही लोकलने प्रवास करत असाल, तर बोरिवली लिंक रोडवरच्या या अतरंगी 'हंग्री जेडी' स्टेशनला भेट द्याच!


व्हिडिओग्राफर - विनीत पेडणेकर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा