Advertisement

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना!


SHARES

प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात. आणि ती पूर्ण करण्यासाठी संघर्षाची तयारी देखील असते. पण काहींसाठी हा संघर्षच त्यांचं आयुष्य बनलेलं असतं. मुंबईतल्या अमीन शेखकडे पाहून ही गोष्ट पटल्याशिवाय राहात नाही. मुंबईतल्या रस्त्यांवर लहानाचा मोठा झालेल्या अमीन शेखनं देखील कॅफे उभारण्याचं स्वप्न पाहिलं. त्याच्यासारख्याच मुलांसाठी! आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकारलंही!



रस्त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांसाठी अमीन शेखनं कॅफे सुरू केला. जेणे करून त्या मुलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांना देखील आयुष्यात काही तरी करण्याची संधी मिळावी. अमीनच्या कॅफेमध्ये सध्या १० तरूण-तरूणी काम करतात. त्यांच्यापैकी काही जण अनाथ आश्रमातील राहणारे होते. तर काही रस्त्यावर राहणारे. पण अमीनमुळे आज ते स्वाभिमानानं जगत आहेत. 'अमीनमुळे आम्हाला संधी मिळाली. त्यानं स्वत: सर्व मेहनतीनं मिळवलं. त्याला जे मिळालं ते त्यानं आमच्याशी देखील वाटलं. आम्हाला कॅफेमध्ये कधीच असं जाणवलं नाही की आमीन बॉस आहे आणि आम्ही त्याच्या हाताखाली काम करणारे. अमीनमुळेच आम्हाला काही ना काही नवीन शिकायला मिळालं', असं तिथे काम करणारी मुलं अभिमानानं सांगतात!   


कॅफे उभारण्यामागे अमीनची मेहनत

अमीन जेव्हा भारतात ड्रायव्हर होता, तेव्हा त्याला कधी कुणी एक कप चहासाठी देखील विचारलं नाही. तेव्हा अमीननं मुंबईत एक कॅफे सुरू करायचा निर्णय घेतला. पण कॅफेसाठी पैसा उभारणार कसा? असा प्रश्न अमीनला पडला होता. पण त्याची ही समस्या देखील अमीनच्याच एका मैत्रिणीनं सोडवली. अमीनची स्पेनची मैत्रिण मार्था मिकेल ही डॉक्टर आहे. भारतात मार्थानं दोन हॉस्पिटल सुरू केले होते. तिच्या हॉस्पिटलमध्ये वीज नव्हती. त्यासाठी मार्थानं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांनी मार्थानं हॉस्पिटलमध्ये वीज आणली. मार्थाची संकल्पना अमीनला आवडली. अमीननं सुद्धा कॅफे उभारण्यासाठी पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला.




पुस्तकासाठी मोठा संघर्ष

अमीननं कॅफेसाठी पुस्तक लिहिण्याचं ठरवलं खरं. पण ते तितकं सोपं नव्हतं. अमीननं त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत पुस्तक लिहिलं. पण दिलीप, विभा, साहील या मित्र-मैत्रिणींनी अमीनच्या पुस्तकाचं प्रूफ रीडिंग केलं. पुस्तक तर लिहिलं, पण आता ते विकायचं कसं? कारण ते प्रकाशित करायला कुणी तयार नव्हतं. फ्रान्समध्ये त्यानं प्रयत्न केले. पण कोणतंच पब्लिकेशन त्याच्या पुस्तकात रूची घेत नव्हतं. त्यामुळे अमीननं पुस्तकाची नोंदणी करण्यापासून ते पब्लिश करण्यापर्यंतची जबाबदारी स्वत: उचलली. पब्लिश केल्यानंतर बुक शॉपमध्ये पुस्तक विक्रीला ठेवण्यासाठी देखील ४൦ ते ५० टक्के मागितले जात होते. पण अमीन तेवढे पैसे देण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे अमीननं रस्त्यावर उभं राहून पुस्तक विकण्याचा निर्णय घेतला. स्पेन, मुंबई आणि महाराष्ट्रात जवळपास रस्त्यावर उभं राहून अमीननं २൦ हजार पुस्तकं विकली. तेव्हा कुठे जाऊन ७५ लाख रुपये जमले. आणि त्या पैशातून अमीननं हा बॉम्बे टू बार्सेलोना कॅफे उभारला. 



अमीनचं लहानपण गेलं रस्त्यावर

अमीन शेख देखील त्यांच्या कॅफेमध्ये काम करणाऱ्या इतर मुलांसारखा रस्त्यावरच लहानाचा मोठा झाला. त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या संघर्षाची आणि परिस्थितीची जाण अमीनला आहे. त्याचं पण बालपण मुंबईच्या रस्त्यांवर गेलं. -६ वर्षांचा असताना अमीनला त्याचे सावत्र वडील जबरदस्ती बेकरीत कामावर पाठवायचे. अमीन बेकरीत १०-११ तास काम करायचा. पण एकदा त्याच्या हातून काचेचा ग्लास फुटला. वडील मारतील या भितीनं तो घर सोडून पळून गेला. पुन्हा कधी त्यानं घराकडे वळून देखील पाहिलं नाही. मालाड रेल्वे स्टेशनवरच अमीन राहायला लागला. त्याच्यासारखी अनेक मुलं तिथे होती.



पोटाची खळगी भरण्यासाठी सुरुवातीला अमीन चोरी करू लगाला. अमीननं घर सोडल्यानंतर त्याची बहीण देखील घर सोडून पळाली आणि स्टेशनवर राहू रागली. एक दिवस त्याला त्याची बहीणसुद्धा स्टेशनवर सापडली. त्यानंतर अमीन बूट पॉलिश, वेटर अशी छोटी मोठी कामं करून गुजराण करायचा. ३ वर्ष रेल्वे स्टेशनवर काढल्यानंतर सिस्टर सेरफीन यांनी अमीनला आणि त्याच्या बहिणीला अंधेरीच्या अनाथ आश्रमात आणलं. पण अनाथ आश्रमात त्याचं मन लागत नव्हतं. सर्व गोष्टी अचानक बदल्यामुळे तो अनाथ आश्रमातल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास अपयशी ठरत होता. त्यामुळे अमीन अनाथ आश्रम सोडून पळाला आणि पुन्हा रस्त्यावर राहू लागला. पण ४-५ दिवसांनंतर अनाथ आश्रममधले फादर प्लॅसी यांनी अमीनला स्टेशनवर पाहिलं. फादरनं २-३ तास समजावल्यानंतर अमीन पुन्हा अनाथ आश्रमात राहण्यास तयार झाला. त्यानंतर अमीननं सातवीपर्यंतचं शिक्षण पालिका शाळेत घेतलं.




बॉम्बे टू बार्सेलोना पहिली फ्लाईट

फादरच्या प्लॅसी यांच्या मदतीनं युस्टिस यांच्याकडे अमीन ड्रायव्हर म्हणून कामाला लागला. युस्टिस हे अमूल गर्लचे क्रिएटर आहेत. अमीन ड्रायव्हर म्हणून कामाला लागला, तेव्हा त्याला इंग्रजीतला इ सुद्धा येत नव्हता. पण फर्नांडिस यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसोबत मोडकं तोडकं का होईना पण तो इंग्रजी बोलायचा. त्यातूनच त्याचं इंग्रजी सुधारू लागलं. युस्टिस दरवर्षी ख्रिसमसला अमीनला एक गिफ्ट द्यायचे. कधी कपडे, कधी पुस्तकं अशा गरजेच्या वस्तू अमीनला दरवर्षी गिफ्ट दिल्या जायच्या. २००२ साली अमीनला 'ख्रिसमसमध्ये काय गिफ्ट हवंय?' असं युस्टिस यांनी विचारलं. स्पेनला जायची अमीनची इच्छा होती. त्यामुळे अमीननं गिफ्टमध्ये स्पेनला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याची मागणी ऐकून युस्टिस आणि त्यांचे मित्र अमीनवर हसले. पण अमीन त्यांना म्हणाला की, 'तुम्हाला जर मला स्पेनला जाण्यासाठी तिकीट द्यायचं नसेल, तर नका देऊ. पण माझ्यावर असे हसू नका'. यावरून अमीन आणि युस्टिस यांच्यात वाद झाला. अखेर युस्टिस अमीनला स्पेनला घेऊन जाण्यास तयार झाले.

अमीनचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमीन त्यांच्यासोबत स्पेनला गेला. पहिली गोष्ट आमीनला जाणवली ती म्हणजे स्पेनच्या रस्त्यांवर एकही लहान मुलगा भीक मागत नव्हता. अमीन काही महिने युस्टिससोबत स्पेनलाच होता. पण २०१० मध्ये युस्टिस यांचं निधन झालं. त्यानंतर अमीन नैराश्यात गेला. युस्टिस अमीनच्या वडिलांसारखे होते. त्यांनी अमीनसाठी खूप काही केलं. पण नैराश्यावर मात करत अमीन पुन्हा कामाला लागला. स्नेहा ट्रॅव्हल्ससोबत अमीन टूअर गाईड म्हणून काम करायला लागला. काही महिने अमीननं त्यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर अमीन पुन्हा स्पेनला गेला. तिकडे अमीननं ड्रायव्हर म्हणून काम केलं. पण हे माझं स्वप्न नाही याची जाणीव अमीनला झाली. भारतातल्या त्याच्यासारख्याच इतर मुलांसाठी त्यानं काही तरी करायचा निर्णय घेतला. अमीननं ठरवलं की स्वत:च्या आयुष्यावर पुस्तक लिहावं आणि पुस्तकातून जमलेल्या पैशातून कॅफे सुरु करावा. आणि तिथेच 'बॉम्बे टू बार्सेलोना'ची खरी सुरुवात झाली! 


कवर फोटो सौजन्य


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा