
शिवाजी पार्क येथे सभा किंवा आंदोलनासाठी परवानगी देण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशांचा हवाला पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आयोजकांनी पर्यायी ठिकाणाचा विचार करून संबंधित प्रक्रियेद्वारे परवानगी घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले.
परवानगी नाकारल्यानंतर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित राजकीय कार्यक्रम शिवाजी पार्कवर होऊ शकतात, मग CJPला परवानगी का नाकारली जाते? असा सवाल त्यांनी ‘X’वरील पोस्टमधून केला.
CJPने 2 ऑक्टोबरला आंदोलनाची घोषणा केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, मतदार याद्यांच्या Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेला स्थगिती आणि निवडणूक आयोगासंदर्भातील कायद्यात सुधारणा, या प्रमुख मागण्या पक्षाने केल्या आहेत.
दरम्यान, प्रस्तावित आंदोलनाच्या ठिकाणांचा विचार करताना वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण तसेच जवळील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता, या बाबींचाही पोलिसांनी उल्लेख केला.
शिवाजी पार्कवरील आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास 2 ऑक्टोबरला मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात येईल, अशी घोषणा अभिजीत दिपके यांनी केली आहे.
हेही वाचा
