
‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात निवडणूक आयोगातील निर्णयप्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या वृत्ताचा हवाला देत चव्हाण यांनी ज्ञानेश कुमार यांनी इतर निवडणूक आयुक्तांशी चर्चा न करता काही निर्णय घेतल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
निवडणूक आयोग ही भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत स्थापन झालेली घटनात्मक संस्था असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच 1995 मधील टी. एन. शेषन प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या अधिकार आणि भूमिकेचा मुद्दा उपस्थित केला.
निवडणूक आयोगाकडून निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले जात असल्याचे सांगण्यात आले, यावरही चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. आयोगातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात, मात्र निर्णय एकमताने किंवा बहुमताच्या आधारे सामूहिक पद्धतीने घेतले जाणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले.
गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (suo motu) या प्रकरणाची दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची तपासणी करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची घटनात्मक प्रक्रिया सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या आरोपांचा संबंध मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि पुन्हा समाविष्ट करणे तसेच मतदार याद्यांच्या Special Intensive Revision (SIR) संदर्भातील निर्णयांवर निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याच्या वृत्तांशी आहे.
हेही वाचा
