'पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांवर कारवाई करा'


'पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांवर कारवाई करा'
SHARES

पालघर जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांकडे दुर्लक्ष करून पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणाऱ्या पालघरच्या पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.


मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र


वाघोबा खिंडीतील गोळीबार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालघर पोलीस ठाण्यात गेलेले पत्रकार हुसेन खान आणि राम परमार यांच्याविरूद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचे खोटे गुन्हे दाखल करत त्यांना तातडीने अटकही करण्यात आली. या पत्रकारांविरूद्ध पोलीस उपनिरीक्षक सैय्यद यांची कॉलर पकडल्याचा आरोप आहे. मात्र, पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही असताना या घटनेची चित्रफित उपलब्ध करून देण्यास पोलीस नकार देत आहेत.


पत्रातून केली 'ही' मागणी

पोलिसांना गोळीबार करावा लागतो, इतकी गंभीर घटना घडली असताना त्यासंदर्भातील गुन्हा नंतर दाखल करण्यात आला. परंतु, या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर अनावश्यक तत्परता दाखवून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, याकडेही मुख्यमंत्र्यांचं लक्षं वेधलं. यासंदर्भात पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याकडेही दाद मागितली. परंतु, त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी पत्रकारांनाच धाकदपटशा दाखवला. यासंदर्भात तातडीने चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावे. शिवाय फक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याविरूद्ध देखील कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा