Advertisement

नारायण राणेंविरोधात विनायक राऊतांचं पंतप्रधानांना पत्र, केली 'ही' मागणी

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा केल्याप्रकरणी विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं.

नारायण राणेंविरोधात विनायक राऊतांचं पंतप्रधानांना पत्र, केली 'ही' मागणी
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. अशी भाषा सहन करु नये, शिष्टाचार राखला पाहिजे, असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात रायगड, पुणे, आणि नाशिकसह जळगावात एफआयआर नोंदवण्यात आला होता. याच दरम्यान, राणेंना रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली. यानंतर नारायण राणे यांना संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.

नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपची जन आशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती स्थगीत करण्यात आली आहे. आता या यात्रेचे रुपांतर आंदोलनात झाल्याचे यात्रा प्रमुख प्रमोद जठार यांनी सांगितलं आहे.

नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. मुंबईतील जुहू परिसरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं.

या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, कार्यकर्ते एवढे आक्रमक झाले होते की, त्यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे पोलिसांना प्रोटोकॉलनुसार अटकेनंतर ही माहिती राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दिली. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक दिसत आहेत. नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली.

नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत नाशिकचे शिवसेना पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी नाशिकच्या महाड पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. आपल्या तक्रारीत सुधाकर म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य संपूर्ण राज्याचा अपमान आहे. सुधाकर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 502, 505 आणि 153 (A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, राणेंच्या वक्तव्यामुळे समाजात द्वेष निर्माण होऊ शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं.

यानंतर युवा सेनेचे सचिव रोहित कदम यांनी पुण्यातील चतुश्रुगी पोलिस ठाण्यात IPC कलम 153, 153 B (1) (C), 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. असाच एक गुन्हा रायगडमध्येही नोंदवण्यात आला आहे.

नारायण राणेंनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांना कोण सल्ला देतो हे त्यांनाच कळत नाही. ते आम्हाला काय सल्ला देणार, ते काय डॉक्टर आहेत? तिसऱ्या लाटेचा त्यांना कुठून आवाज आला, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची तुम्हाला माहिती नसावी.



हेही वाचा

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

नारायण राणे येऊन गेल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा