Advertisement

काळा घोडा नाही, हरा घोडा फेस्टिव्हल!


SHARES

काळा घोडा फेस्टिव्हल...दरवर्षी काळा घोडा फेस्टिव्हलबद्दल खूप काही ऐकलं होतं. पण यावर्षी खऱ्या अर्थानं मी काळा घोडा फेस्टिव्हल अनुभवला. ऑफिसला सुट्टी घेऊन खास काळा घोडा फेस्टिव्हलला जाण्याचा बेत केला. हा येईल तो येईल या नादात दरवर्षी काळा घोडा फेस्टिव्हलला मुकावं लागायचं. पण यावर्षी मी कुणालाच विचारायचं नाही ठरवलं आणि एकटीच फेस्टिव्हलला निघाले. काळा घोडा फेस्टिव्हलला काय काय असेल? याचे अनेक अंदाज बांधून झाले होते. अखेर काळा घोडा फेस्टिव्हलला पोहोचले. ऑड डे होता पण प्रचंड गर्दी होती. त्यामुळे सहाजिकच कडेकोट बंदोबस्त देखील होता. एन्ट्रीला सुरक्षा रक्षक आणि पोलिस तपासूनच सर्वांना आत सोडत होते. एखादी जत्रा असल्यासारखं वाटत होतं.



एन्ट्री करताच उजव्या बाजूला काळ्या रंगाच्या घोड्याचा एक मोठा पुतळा होता. मनात म्हटलं म्हणून की काय या परिसराला काळा घोडा हे नाव पडलं? त्यानंतर नजर पडते ती वेगवेगळ्या रंगांमध्ये लावण्यात आलेल्या कर्टेन्सवर. एखादं इंद्रधनुष्य पाहतोय की काय? असाच भास तुम्हाला होईल. तिथेच आर्टवर्क केलेल्या दोन कार देखील उभ्या होत्या. त्या कारवरची क्रिएटिव्हिटी पाहून मी चकितच झाले! त्यापैकी एका कारवर ग्रीन कलरच्या दोन वेगवेगळ्या बाजू पाहायला मिळत होत्या. कारच्या एका बाजूवर हिरवळ म्हणजेच निसर्गाचा हिरवा रंग दाखवणारं गवत होतं, तर दुसरी बाजू भारतीय लष्कराच्या युनिफॉर्मचा हिरवा रंग दाखवत होती. त्यावर 'नॅशनॅलिस्ट की नॅच्युरलिस्ट' असा मेसेज देखील लिहिला होता.



तर प्रदर्शनात दुसरी कार ही मर्सिर्डीज बेंझ होती. कुणाल बेदी या आर्टिस्टनं तिला पूर्णपणे मॉडिफाय केलं होतं. कार वेगवेगळ्या रंगांमध्ये पेंट करण्यासाठी कुणालला जवळपास ८७ दिवस लागले. ही कारसुद्धा कलाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होती.



यावर्षी काळा घोडा फेस्टिव्हलची थीम ही 'हरा घोडा' आहे. त्यामुळे फेस्टिव्हलमध्ये घोड्याच्या कलाकृतीला हिरवा रंग देण्यात आला आहे. 'डिस्कनेट टू कनेक्ट' अशी या कलाकृतीची स्टोरीलाईन आहे. डिजिटल जगापासून डिस्कनेट होऊन निसर्गाशी कनेक्ट कसं व्हायचं, हे इथे सूचित करण्यात आलं आहे. या घोड्याचा बेस स्टीलचा असून गॅजेटपासून म्हणजे जुने टेलिफोन्स, वायर्स, सीडी वापरून बनवण्यात आला आहे. त्यानंतर मध्ये एक गॅप दिल्यानंतर टॉपची बाजू ग्रीन रंगात रंगवण्यात आली आहे. त्यावर सर्व जनरेशन्स दाखवण्यात आल्या आहेत. ओल्ड एज, मिडल एज आणि यंग एज अशी सामान्य चेहऱ्यांची प्रतिकृती पाहायला मिळते. घोड्याच्या बाजूनं एक राईड दाखवण्यात आली आहे. डिजिटल जगातून बाहेर पडून निसर्गाशी कसे जोडले जाल, हे इथे दाखवण्यात आलं आहे.



थोडं पुढे गेल्यावर एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. एका तुटलेल्या झाडाच्या बुंध्यावर मोठमोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडात बोगदे केले आहेत. ज्यातून रेल्वे जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. झाडाच्या बुंध्यावर फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे. याच झाडाच्या बुंध्यावर वांद्रे-वरळी सी लिंक देखील पाहायला मिळतो. म्हणजे एकूणच कशाप्रकारे विकास निसर्गाच्या मुळाशी येतोय, हे या स्ट्रक्चरमधून अधोरेखित करण्यात आलं आहे. विकासाचं एक वेगळं मॉडेलं इथं पाहायला मिळत आहे.



या फेस्टिव्हलमध्ये आणखी एक आकर्षण म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाचा चरखा. चरख्याच्या मदतीनं कापसापासून खादीचा दोरा कसा तयार होतो? हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं. मला काही राहवलं नाही. मी सुद्धा चरखा चालवलाच!     



याशिवाय अनेक आर्टिस्ट्सनी आपल्या कला सादर केल्या. टाकाऊपासून कलात्मक वस्तू बनवण्यात आल्या होत्या. हस्तकला, खाद्यपदार्थ, सजावटीचे साहित्य, वर्कशॉप, संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम असं भरपूर काही पाहण्यासारखं आहे. लहान मुलांची तर धमालच चालली होती. पेंटिंग, गेम्स, बाहुल्यांचा खेळ असं भरपूर काही आयोजित केलं होतं. त्यामुळे मोठ्यांसोबतच चिमुकले देखील फेस्टिव्हलमध्ये रमले होते.



आता एवढं सगळं असताना मुंबईकर कसले ऐकतायत? कॅमेरा काढून फोटोसेशन सुरूच ना! तिथं उभारण्यात आलेल्या कलेमागचा संदेश त्यांना कळत होता की नाही ते माहित नाही. पण फोटोसेशन मात्र जोरात सुरू होतं!

   


हुश्श...माझ्या पायाचे अक्षरश: तुकडे पडले. काळा घोडा फेस्टिव्हलला यायचं म्हणजे पाच-सहा तास तर आरामात जातात. पण तरीही जेवढं पाहावं तेवढं कमीच! बरंच काही सांगायचं राहूनही गेलंय. पण आता ते सगळं आणि मी सांगितलेलं सगळं पहाण्यासाठी एकदा भेट देऊन याच काळा घोडा फेस्टिव्हलला! ११ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे टेन्शन नाय!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा