मोनोराणी आठवडाभर यार्डातच; एमएमआरडीएचे मोठे नुकसान


  • मोनोराणी आठवडाभर यार्डातच; एमएमआरडीएचे मोठे नुकसान
SHARE

गुरूवारी पहाटे सव्वा पाच वाजल्यापासून ठप्प झालेली मोनोरेलची सेवा तिसर्या दिवशीही ठप्पच आहे. तर आठवडाभर मोनो बंदच राहण्याची शक्यता आहे. कारण मोनो गाड्यांच्या सुरक्षा चाचण्यांच्या अहवालानंतरच मोनो सेवा सुरू करण्याचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिरणा (एमएमआरडीए) चे महानगर आयुक्त युपीएस मदान यांनी दिले आहेत. त्यानुसार या चाचण्या पूर्ण करत अहवाल सादर करण्यासाठी आणखी किमान आठवडाभर लागणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.  त्यामुळे आणखी आठवडाभर मोनो गाड्या यार्डातच राहणार असून त्याचा फटका प्रवाशांना तर बसणार आहेच पण एमएमआरडीएला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

चेंबुर मोनो स्थानकातून वडाळ्याच्या दिशेने निघालेल्या मोनो गाडीला गुरूवारी पहाटे म्हैसुर काँलनी स्थानकादरम्यान इलेक्ट्रिक ब्रेक फेल झाल्याने आग झाली. ही आग इतकी मोठी होती की त्यात मोनो गाडीचे दोन डब्बे जळून खाक झाले. आग लागल्याने मोनोची सेवा ठप्प झालीच पण त्यामुळे मोनो प्रकल्पासह प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही एरणीवर आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मदान यांनी त्वरीत चौकशीचे आदेश दिलेच, पण त्याचवेळी प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मोनोच्या चाचण्या झाल्याशिवाय, मोनो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय मोनो ट्रँकवर आणायची नाही असाही निर्णय घेतला.


या निर्णयानुसार मोनो गाड्यांची चाचणी सुरू आहे. तर दुसरीकडे आग नेमकी कशी लागली यासह फायर फायटींग सिस्टीम आहे का, असल्यास ती सक्षम आहे का, नसेल तर ती का नाही यासंबंधीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते आहे. कारण मोनोमध्ये फायर फायटींग सिस्टीम नसल्याची जोरदार चर्चा आहे. याविषयी खंदारे यांना विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

चेंबुर ते वडाळा मोनो मार्ग तसे पाहिले तर फेल गेला आहे. कारण या मार्गाला प्रवाशीच मिळत नाहीत. जोपर्यंत चेंबुर ते जेकब सर्कल असा पूर्ण मार्ग तयार होत नाही तोपर्यंत मोनो तोट्यातच राहणार आहे. दरम्यान आजच्या घडीला मोनोला प्रवाशी मिळत नसल्याने एमएमआरडीएला दिवसाला अंदाजे सात लाखांपर्यंतचा तोटा सहन करावा लागत आहे. हा आकडा दहा लाखांपर्यंत असल्याचेही म्हटले जात आहे.

जर मोनो सेवेत असताना सात ते दहा लाखांचा तोटा सहन करावा लागत असेल तर आता मोनो किमान दहा दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएला होणार्या तोट्यात आणखी भर पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना हा मार्गच फायद्याचा नसल्याने प्रवाशी मोनोकडे वळत नसताना आता मोनोच्या सुरक्षेचाच प्रश्न एरणीवर आल्याने आहे ते  प्रवाशी तरी पुन्हा मोनोकडे वळतील का असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

हे ही वाचा

'द बर्निंग' मोनोरेल

चेंबूरमध्ये मोनो समोरासमोर, अपघात की बचावकार्य?

अखेर मेट्रोसाठीचं पहिलं टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरलं!

संबंधित विषय