मुंबई - मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागानं विद्यापीठातील हॉलमध्ये देशातील 25 वर्षांतील आर्थिक सुधार आणि अडथळे या विषयावर व्याखान आणि चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांनी आपले विचार मांडले. दरम्यान प्रश्नोत्तराच्या वेळी विद्यार्थ्यांनी नोटाबंदीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पी. चिदंमबरम यांनी सांगितले की, नोटाबंदी म्हणजे आर्थिक सुधार नाही. नोटाबंदी शेतकरी, गरीब, कष्टकरी, छोटे उद्योगधंदे यांना उध्द्वस्त करणारा निर्णय आहे. जे नोटाबंदीचे समर्थन करत आहे त्यांना अर्थशास्त्राचे साधे ज्ञान नाही आहे असे वाटते. नोटाबंदी मनुष्याने तयार केलेली अपराजीत शोकांतिका आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा थांबवू शकत नाही. रोकड पैसा असणे म्हणजे काळा पैसा असणे आणि सर्व रोकड हा काळा पैसा नसतो हा चुकीचा विचार आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं. आपल्या व्याखानात पी. चिदंमबरम यांनी खऱ्या आर्थिक सुधारांची सुरुवात 1991 नंतर झाल्याचं सांगितलं.