घाटकोपरमध्ये दुचाकीस्वाराची दादागिरी, वाहतूक पोलिसावरच हल्ला


घाटकोपरमध्ये दुचाकीस्वाराची दादागिरी, वाहतूक पोलिसावरच हल्ला
SHARES

चोर तर चोर वर शिरजोर याच म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी घाटकोपरमध्ये दिसून आला. एक दुचाकीस्वार नो एन्ट्रीमधून दुचाकी चालवत होता. त्यामुळे त्या दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांनी अडवले. पण त्याने उलट वाहतूक पोलिसावरच जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी घाटकोपर येथे घडली. दीपक निकाळे असे वाहतूक पोलिसाचे नाव असून ते घाटकोपर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. 


हेही वाचा - 

महिला कारचालकाची पोलिसांवर दादागिरी

मुजोर पोलिसांची दादागिरी सीसीटीव्हीत कैद


शुक्रवारी सायंकाळी ते असल्फा जंक्शन येथे ड्युटीवर होते. याच दरम्यान एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी तत्काळ या दुचाकीस्वाराला अडवले. विरुद्ध दिशेने आल्याने त्याला दंड भरण्याचे निकाळे यांनी सांगितले. दुचाकीस्वाराने दंड भरण्यास नकार दिल्याने बराच वेळ या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होती. काही वेळातच या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान संतापलेल्या दुचाकीस्वाराने रस्त्यालगत पडलेला पेव्हर ब्लॉक निकाळे यांच्या डोक्यावर मारून पळ काढला. काही रहिवाशांनी तत्काळ त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. ही बाब घाटकोपर पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ निकाळे यांच्या तक्रारीवरुन अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात सरकारी कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा