ट्रेनमधलं किकी चॅलेंज अंगलट, न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा

किकी चॅलेंजचा व्हिडिओ बनवणारे ३ तरूण बुधवारी पोलिसांच्या तावडीत सापडले. या तिघांनाही पोलिसांनी वसई रेल्वे न्यायालयात सादर केल्यावर न्यायालयाने या तिघांनाही वसई रेल्वे स्थानकाची ३ दिवस साफसफाई करण्याची शिक्षा सुनावली.

ट्रेनमधलं किकी चॅलेंज अंगलट, न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा
SHARES

विरार ट्रेनमध्ये किकी चॅलेंज करणाऱ्या तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस या तरूणांच्या शोधात होते. अखेर हा व्हिडिओ बनवणारे ३ तरूण बुधवारी पोलिसांच्या तावडीत सापडले. या तिघांनाही पोलिसांनी वसई रेल्वे न्यायालयात सादर केल्यावर न्यायालयाने या तिघांनाही वसई रेल्वे स्थानकाची ३ दिवस साफसफाई करण्याची शिक्षा सुनावली.


कोण आहेत हे तरूण?

निशांत शहा (२०), ध्रूव शहा (२३) आणि श्याम शर्मा (२४) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनीच विरार रेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनमध्ये किकी चॅलेंज पूर्ण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केला होता. या तिघांनाही वेगवेगळे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचा छंद आहे. यापैकी ध्रूव शहा यू ट्युब वर फंचो इंटरटेन्मेट या बॅनरअंतर्गत व्हिडिओ अपलोड करतो. तर निशांत टीव्ही सिरिअल्समध्ये कलाकार म्हणून काम करतो.


याआधीचं किकी चॅलेंज

रेल्वे पोलिसांनी सांगितलं की, या तिघांनी या आधीही एक अॅम्ब्युलन्ससमोर किकी डान्स केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही अॅम्ब्युलन्स शोधून काढत ड्रायव्हरची चौकशी केली. या चौकशीत या तिन्ही तरूणांची नावं पुढं आली.


झाला पश्चाताप

या तिघांनाही वसई रेल्वे न्यायालयात उभं केलं असता, हे तिघेही धाय मोकलून रडू लागले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ दिवस रोज वसई रेल्वे स्थानकाची साफसफाई करण्याची शिक्षा सुनावली. एवढंच नाही, तर साफसफाई करत असताना या तिघांचा व्हिडिओ बनवून तो न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. हा व्हिडिओ आल्यानंतर न्यायालय त्यांची पुढील शिक्षा ठरवेल.



हेही वाचा-

किकी चॅलेंज स्वीकारण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा