Advertisement

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024: 13 जागांवर अंदाजे 49.15% मतदान

मुंबईत ५० टक्के मतदान होण्याची अपेक्षा आहे

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024: 13 जागांवर अंदाजे 49.15% मतदान
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी राज्यातील उर्वरित 13 मतदारसंघांत मतदान पार पडले. या 13 मतदारसंघांत सरासरी 49.15 टक्के मतदान झाले. उपलब्ध आकडेवारीनुसार, सर्वात जास्त मतदान पालघर मतदारसंघात सरासरी 54.32 टक्के इतके झाले असून सर्वात कमी मतदान कल्याण मतदारसंघात 41.70 टक्के इतके झाले आहे.

उन्हाळी सुट्ट्या तसेच वाढलेला उष्मा पाहता मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. अगदी सकाळी अनेक ठिकाणी रांगा होत्या. वाढत्या उन्हामुळे दुपारी काही प्रमाणात गर्दी कमी झाली. मात्र, ऊन ओसरल्यानंतर पुन्हा मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते.

पाचव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह वर्षा गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे अशा दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.

4 जून रोजी मुंबईकरांच्या मनात कोण? महायुती की महाविकास आघाडी हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यांत विभागली गेली होती. सोमवारी पाचव्या व शेवटच्या टप्प्यात उर्वरित 13 मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील निवडणूक रणधुमाळीची सांगता झाली. 

मुंबईतील सहा, ठाण्यातील तीन, नाशिकमधील दोन मतदारसंघांसह पालघर व धुळे मतदारसंघात मतदान पार पडले. 2019ला या सर्व जागा शिवसेना- भाजप युतीने जिंकल्या होत्या. पण राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे यावेळी सर्वच मतदारसंघांत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा मुंबईत येऊन गेले. एकदा रोड शोसाठी तर नंतर महायुतीची सांगता सभादेखील त्यांनी घेतली. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी देखील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण हे शिवसेनेचे गड मानले जाणारे भाग आहेत. या ठिकाणचे मतदार शिवसेना कोणाची यावर अंतिम शिक्कामोर्तब करणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दक्षिण मुंबई, ठाणे व नाशिक या जागा भाजपकडून खेचून घेतल्या आहेत. त्यामुळे या जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. शिवाय ठाणे या आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तसेच कल्याणमध्ये त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मैदानात आहेत.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही हा टप्पा महत्त्वाचा असणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत चार, ठाण्यातील दोन, याशिवाय नाशिक व पालघर अशा आठ जागा लढवत आहे. यातील सहा ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेशी त्यांचा थेट सामना होणार आहे.

भाजपने शिंदे सेना, अजितदादांसोबत यावेळी मनसेचे इंजिनही जोडले आहे. मनसेची मते महायुतीला कशी ट्रान्स्फर होतील यावर काही उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

पवई, मागाठाणे आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन उकाड्यात ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाल्याने अनेक मतदार मतदान न करताच बाहेर पडले.

मतदार यादीतून नाव गायब झाल्याच्या तक्रारी

अनेक मतदान केंद्रांवर वीजपुरवठा खंडित झाल्याने मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू होती, तर अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. दुपारी १२ नंतर उन्हाचा पारा चढत गेल्यानंतर मतदान केंद्रांवरील गर्दी कमी झाली. परंतु, संध्याकाळी ४ नंतर पुन्हा एकदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती.

पाच वाजेपर्यंतची मतदानाची सरासरी टक्केवारी

भिवंडी - 48.89 टक्के

धुळे - 48.81 टक्के

दिंडोरी - 57.06 टक्के

कल्याण - 41.70 टक्के

मुंबई उत्तर - 46.91 टक्के

मुंबई उत्तर-मध्य - 47.32 टक्के

मुंबई उत्तर-पूर्व - 48.67 टक्के

मुंबई उत्तर-पश्चिम - 49.79 टक्के

मुंबई दक्षिण - 44.22 टक्के

मुंबई दक्षिण-मध्य - 48.26 टक्के

नाशिक - 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

ठाणे - 45.38 टक्के



हेही वाचा

घाटकोपरमध्ये होर्डिंग पडलेल्या ठिकाणी रोड शो करणे अमानवीय : संजय राऊत

मतदानकेंद्रावरील टॉयलेटमध्ये मृतावस्थेत आढळला ठाकरे गटाचा बूथ एजंट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा