Advertisement

येत्या १५ दिवसांत बेस्टच्या ताफ्यात येणार विजेवरील ८ बसगाड्या


येत्या १५ दिवसांत बेस्टच्या ताफ्यात येणार विजेवरील ८ बसगाड्या
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं मुंबईची लाइफलाइन लोकल बंद ठेवण्यात आली होती. परिणामी बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळं प्रवाशांची वाढती संख्या पाहता बेस्टच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या ३०८ वातानुकूलित बस दाखल केल्या जाणार आहेत. या बस भाडेतत्त्वावरील आहेत. ८ बस येत्या १५ दिवसांत, तर ३०० बस नोव्हेंबरपासून टप्प्याटप्यात बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या अपुऱ्या पडणाऱ्या बसगाड्यामुळे प्रवाशांकडून त्यांची संख्या वाढवण्याचीही मागणी केली जात आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बस आहेत. यामध्ये बेस्टच्या स्वमालकीच्या ८९८ बसचे आयुर्मान संपत आल्याने पुढील वर्षांच्या मार्च महिन्यापर्यत त्या भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यातच भाडेतत्त्वावरील १,२०० मिनीबसपैकी फक्त ४६० बसच ताफ्यात आल्याने बेस्टचा गाड्याचा ताफा कमी होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर नियम पाळताना प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बसची संख्या वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून प्रयत्न होत आहेत. गतवर्षी जून महिन्यात बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी विजेवरील बस बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार प्रथम ३४६ बसचे नियोजन केले गेले. आतापर्यंत केवळ ३८ बस दाखल झाल्या होत्या.

यामध्ये बेस्टच्या मालकीच्या सहा विनावातानुकूलित बस असून भाडेतत्त्वावरील वातानुकूलित ३२ मिडी बस आहेत. त्यानंतर आणखी ८ मिडी वातानुकूलित बस येत्या १५ दिवसांत दाखल होतील. तसेच १६० मिडी आणि १४० एकमजली मोठ्या आकाराच्या बस येत्या नोव्हेंबरपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. या ३०० बस वातानुकूलित आणि भाडेतत्त्वावर असणार आहेत.

प्रत्येक एकमजली बसची किंमत २ कोटी रुपये आणि मिडी बसची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. भाडेतत्त्वावरील १,२०० बसव्यतिरिक्त विजेवरील बस आल्यास बेस्टचा गाड्याचा ताफा आणखी वाढणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा