‘प्रगती’च्या माजी विद्यार्थ्यांचा शानदार ‘जल्लोष’

बोरीवली - गोराई येथील प्रगती विद्यालय आणि ज्युनिअर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे सलग तिसऱ्या वर्षी एकत्र येऊन गुरुवारी ‘जल्लोष’ कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेहसंम्मेलन झाले. नुकताच झालेला हा सोहळा कोणत्याही एका बॅचपुरता मर्यादित न ठेवताना शाळेच्या पहिल्या 1995 पासून ते अगदी गतवर्षीच्या 2016 सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनीही यावेळी उपस्थिती लावली.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याचा पाया हा शाळेमध्ये पक्का होतो. ज्या शाळेमध्ये दंगा, मस्तीसह शिक्षणाचे धडे गिरवून आपल्या भविष्याचे स्वप्ने रंगवली, त्याच शाळेत पुन्हा एकदा पाऊल टाकण्याची संधी मिळाली तर. तोच बेंच, तोच वर्ग आणि तेच शिक्षक, पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शिक्षकांची भेट होणे, यासारखा दुसरा आनंद नाही. असा एक अनोखा माजी विद्यार्थ्यांचा ‘जल्लोष’ सोहळा प्रगती विद्यालयामध्ये पार पडला.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी ‘गॅदरींग’च्या दिवसांच्या आठवणी ताज्या करताना नृत्य, नाटीकांचे सादरीकरण केले. शाळेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमादरम्यान तसेच, प्रत्येक बॅचच्या प्रतिनिधीने आपल्या ‘गँग’च्या वतीने शाळेचे आणि शिक्षकांचे आभार मानताना जुन्या आठवणींना उजाळाही दिला.

शाळेबाहेरील जगात आमचे विद्यार्थी यशस्वी झाले, आमच्यासाठी याहून मोठा आनंद नाही. आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती शाळेचे विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. वर्षातील एक दिवस जुन्या विद्यार्थ्यांची भेट होणे, हा भावनिक क्षण आहे. विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकांचे यश असते. आजही आमचे विद्यार्थी शाळेशी जोडले गेले आहेत, याचा अधिक आनंद आहे, अशी प्रतिक्रीया यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या