पशुवैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता अभियान

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

परळ - डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त 1 मार्च 2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानाचा एक भाग म्हणून परळ पूर्व येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात 2 हजार स्वयंसेवकांनी एकत्र येऊन हा परिसर स्वच्छ केला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नियुक्ती स्वच्छतादूत म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या सहकार्याने परळ पूर्व येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात लागणारे हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य देण्यात आले.

या अभियानाला पाठिंबा देत महाविद्यालयाच्या 16 एकर जागेत हे अभियान राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचं पशुवैद्यकीय महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता आशिष पातुस्कर यांनी सांगितले. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या कचऱ्याची महापालिका एफ दक्षिण विभागाच्या वतीने विल्हेवाट लावण्यात येणार असून येत्या दोन दिवसात हा एकत्रित केलेला कचरा उचलण्यात येईल. अथवा त्यावर प्रक्रिया राबविण्यात येईल, असं परिवेक्षक जे. डी. जाधव यांनी सांगितलं. तर, येथील कचरा बाहेर घेऊन जाण्याऐवजी कचऱ्यात गोळा करण्यात आलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करता येऊ शकेल. त्यासाठी महापालिका एफ दक्षिण विभागाच्या वतीने प्रशिक्षण देण्याचे सहकार्य करण्यात येईल, असं सहाय्यक मुख्य परिवेक्षक विजयकुमार जकांनी यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या