दादरमध्ये 'आर्टिस्ट कॅम्प' चित्रप्रदर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला

महानगरपालिका शिक्षण विभाग आणि संगीत व कला अकादमीच्या कला विभागाच्या वतीने 'आर्टिस्ट कॅम्प 2016-17' चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे चित्र प्रदर्शन दादर येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कला दालनात 2 ते 5 मे या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वा. या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला प्राचार्य दिनकर पवार, माजी कला प्राचार्य श्रीकृष्ण माईनकर तसेच केंद्र प्रमुख आणि कला शिक्षक उपस्थित होते.

मनपा कला विभागातर्फे अलिबाग- रेवदंडा आणि मुरूड परिसरात मार्च महिन्यात तीन दिवसीय 'आर्टिस्ट कॅम्प' भरवण्यात आले होते. त्यात कला शिक्षकांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी सुप्रसिद्ध आर्टिस्ट नानासाहेब येवले, किशोर नादावडेकर आणि अक्षय पै यांना आमंत्रित करण्यात आले होते. या 'आर्टिस्ट कॅम्प' मधील कलाकृतींचे चित्रप्रदर्शन दादर येथे भरवण्यात आले आहे. दरवर्षी कला शिक्षक निसर्गचित्रण कार्यशाळा विविध निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करण्यात येते. या कॅम्पमध्ये तयार होणाऱ्या कलाकृतींची लायब्ररी तयार करून या कलाकृती महापालिकेच्या अतिमहत्वाच्या कार्यालयांत लावण्यात येतात. 

तत्पूर्वी त्यांचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात येते. यंदा या प्रदर्शनात 60 कला शिक्षकांच्या आणि 5 मार्गदर्शक कलाकारांच्या कलाकृती लावण्यात आल्या आहेत. त्यासाठी मनपा शाळेतील 45 कार्यरत कला शिक्षक आणि इतर 20 कला शिक्षक या आर्टिस्ट कॅम्पमध्ये सहभागी झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. तर कलारसिकांनी या निसर्गचित्रांचा आस्वाद घेण्यासाठी चित्रप्रदर्शनाला अवश्य भेट दयावी असे आवाहन कला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या