विक्रोळीत पार पडली बाल चित्रकला स्पर्धा

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

विक्रोळी - जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने बालचित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली असून सोमवारी 9 जानेवारीला विक्रोळी पार्कसाइट इथल्या प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यान येथे ती पार पडली. या स्पर्धेत महानगरपालिका आणि खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात पालिका शाळेतील 373 आणि खाजगी शाळेतील 713 अशा एकूण 1 हजार 86 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या वेळी स्त्री भ्रूण हत्या, माझी मुंबई, माझी शाळा, माझी मुंबईतील सहल आणि माझी डिजिटल शाळा या विषयांवर मुलांनी चित्रे काढली. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रभाग क्रमांक 123 च्या नगरसेविका डॉ. भारती बावदाणे यांनी ही बाल चित्रकला स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्यास 20 हजार रुपये आणि सन्मान चिन्ह, तर तृतीय क्रमांक पटकवणाऱ्याला 15 हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तर उत्तेजनार्थ बक्षिसासाठी पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या