वैविध्याला नावीन्याची किनार लाभलेलं चित्र प्रदर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला

कोणत्याही गोष्टीत वैविध्य असेल तर ती गोष्ट अधिक आनंददायी वाटते. वैविध्याला नावीन्याची किनार लाभलेलं ३७ कलाकारांच्या चित्रांचं प्रदर्शन महाराष्ट्र कला अकादमीमध्ये भरलं आहे. वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे या चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. २५ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे चित्रप्रदर्शन सुरू राहणार आहे. 

जलरंग, ऑइल पेस्टल्स, अॅक्रेलिक यांसारख्या विविध प्रकारे रंगवलेली चित्र या प्रदर्शनात पाहायला मिळतील. भिन्न शैलीतली चित्र या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहेत. वेगवेगळ्या छटांमधल्या रंगांची आख्खी दुनियाच या प्रदर्शनाच्या माध्यमातून खुली करण्यात आली आहे.

चित्रकलेतले एक एक आविष्कार उमगत जातात आणि मग कलेचे किती अविष्कार साकारता येऊ शकतात याची प्रचितीच प्रदर्शनात सहभागी चित्रकारांनी दिली. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचं मन वेगवेगळ्या चित्रांमध्ये अक्षरश: रंगून गेलं.

 

वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था समाजिक कार्यात हातभार लावते. या प्रदर्शनामार्फत उभा करण्यात आलेला निधी पालघरमधल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. यापूर्वी देखील वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्टनं असे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. या कार्यक्रमांमार्फत मिळणारा निधी समाज कल्याणासाठी वापरला जातो.

पुढील बातमी
इतर बातम्या