रियल टू रिल...

रिमेक आणि सिक्वेलच्या लाटेबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये बायोपिक चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह तयार झाला आहे. लोकप्रिय आणि कर्तृत्ववान व्यक्तीवर बनवण्यात आलेला बायोपिक रोमांचकारी असतो. त्यामुळे बायोपिकला प्रेक्षकांची पसंती मिळते. वास्तवात एका अशा व्यक्तिमत्त्वाचे जीवन आणि कार्य प्रेक्षकांसमोर मांडणं दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी आव्हानात्मक असतं. पण असे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी हा धोका चांगल्याप्रकारे पेलला. याचाच परिणाम म्हणून की काय, २൦१६ या एकाच वर्षात पाच बायोपिक प्रदर्शित झाले. निरजा, दंगल, अजहर, सरबजीत आणि एम. एस. धोनी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. काल्पनिक चित्रपट सर्वांनाच आवडतात. पण एखाद्याच्या खऱ्या आयुष्यावर आधारित चित्रपट पाहायला कुणाला नाही आवडणार? प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील खडतर मार्ग, संघर्ष आणि त्यांनी समस्यांवर मात करत मिळवलेलं यश यातून प्रेक्षकांना प्रेरणा मिळते.

२൦१७ या वर्षातही प्रेक्षकांना असे अनेक बायोपिक पाहता येणार आहेत. येत्या काळाता एक, दोन नाही तर असे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट कोणाच्या आयुष्यावर आधारित आहेत? आणि यात कोणते कलाकार काम करणार आहेत?

श्रद्धा कपूर - 'फुलराणी'

बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच पाहायला मिळणार आहे. २൦१८ मध्ये सायनावर आधारित बायोपिक प्रदर्शित होऊ शकतो. विशेष म्हणजे सायना नेहवालच्या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली आहे. अमोल गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अमोल गुप्ते यांनीच सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धाची निवड केली.

सायनाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम करायला मला खूप आवडेल. ही भूमिका खूप चॅलेंजिंग आहे. माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी कुणालाच निराश करणार नाही आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन, असं एका मुलाखतीदरम्यान श्रद्वानं सांगितलं.

सायनाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाची चर्चा होती. सायना नेहवालनेही दीपिकाला पसंती दिली होती. सायनानुसार, दीपिकाचे वडील एक बॅडमिंटन खेळाडू आहेत आणि दीपिकाही चांगली बॅ़डमिंटन खेळते. त्यामुळे ती या रोलसाठी योग्य आहे, असं सायनानं एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं. पण या रोलसाठी दीपिका नाही तर श्रद्धाची निवड झाली आहे.

श्रद्धा कपूर 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई'

'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई'च्या निमित्तानं बॉलिवूडमध्ये आणखी एक स्त्रीप्रधान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. 

आत्तापर्यंतच्या चित्रपटांपैकी वेगळी आणि दमदार भूमिका श्रद्धा साकारत आहे. श्रद्धानंही या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतल्याचं दिसून येतंय. यात श्रद्धाचा लूक पाहून तुम्ही थक्क व्हाल.

आत्तापर्यंत श्रद्धा कपूरनं अनेक ग्लॅमरस भूमिका साकारल्या आहेत. पण पहिल्यांदाच श्रद्धाचा डिग्लॅमरस लूक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचे रागीट हावभाव अधिक लक्षवेधक आहेत. २൦१४ मध्ये हसीना पारकरचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. ती दाऊदच्या गुन्हेगारी विश्वाचा कारभार सांभाळायची, असं सांगितलं जायचं. 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई' हा चित्रपट १४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे श्रद्धा हसीनाच्या भूमिकेला न्याय देईल की नाही हे १४ जुलैलाच कळेल.

प्रियंकाची 'कल्पना'?

पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावलाच्या आयुष्यावरही लवकरच चित्रपट येणार आहे. हॉलिवुडमध्ये झेंडे गाडल्यानंतर प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. लवकरच प्रियंका चोप्रा कल्पना चावलावर बनणाऱ्या बायोपिकचा हिस्सा बनू शकते, अशी चर्चा सध्या बॉलिवुडमध्ये रंगली आहे. या चित्रपटात ती कल्पना चावलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण याबाबत कुठलीच अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये.

प्रिया मिश्रा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. चित्रपटासाठी प्रिया कल्पना चावलाच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. कुटुंबियांना भेटून कल्पनाबद्दल प्रिया सध्या सखोल अभ्यास करतेय. प्रियंकाही लवकरच कल्पनाच्या कुटुंबियांना भेटणार असल्याच्या चर्चा आहेत. जर प्रियंका कल्पना चावलाची व्यक्तिरेखा साकारणार असेल तर हा तिचा दुसरा बायोपिक ठरेल. यापूर्वी तिनं मेरी कोमची व्यक्तिरेखा साकारली होती.

नायक नही 'खलनायक' हूँ मैं /

अभिनेता म्हणून संजय दत्तची सुरुवात चांगलीच गाजली. पण नंतर तो ड्रग्जच्या आहारी गेला. ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी संजय दत्तवर अमेरिकेत उपचार करण्यात आले. सुनिल दत्त यांच्या सांगण्यावरून संजय दत्त पुन्हा भारतात परतला. काही हिट चित्रपट दिले. पण आणखी एका प्रकरणामुळे संजय अडचणीत आला. १९९२च्या दंगली आणि त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटात संजय दत्तचं नाव समोर आलं. २१ मार्च २൦१३ ला बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली संजय दत्तला ५ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.

संजय दत्तनं आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्याच्या याच जीवन प्रवासावर राजकुमार हिराणी यांनी बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला. संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी बॉलिवुडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरची निवड करण्यात आली. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातले सहा वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे रणबीर कपूर सहा वेगवेगळ्या लूक्समध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. दाढी, मिशा, कपाळावर लाल टिळा आणि निळ्या रंगाचा शर्ट या प्रौढ रुपातला रणबीरचा एक फोटोही सोशल मीडियावर मध्यंतरी वायरल झाला होता.

अर्जुन कपूर झाला 'डॅडी'

डॅडी...बस्स नाम ही काफी है. डॅडी हे नाव वाचल्यावर तुम्हाला कळलंच असेल की हा डॉन दुसरा तिसरा कुणी नाही तर दगडी चाळीत गुन्हेगारी दुनिया चालवणारा अरुण गवळी आहे. अरुण गवळीला ओळखणारे त्याला 'डॅडी' या नावानेच हाक मारत. त्यामुळे सिनेमाचे नावही 'डॅडी' ठेवण्यात आले आहे. दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. असीम आहलुवालिया यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अर्जुन रामपाल अरूण गवळीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.

अर्जुन रामपालने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या पहिल्या लूकचा फोटो अर्जुननं ट्वीटरवरही शेअर केला होता.

बायोपिक संकल्पना सध्या बॉलिवुडमध्ये हिट ठरत आहे. पण यामागे त्यात काम करणाऱ्या किंवा ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांचंही तेवढंच योगदान आहे. लोकप्रिय आणि कर्तृत्ववान व्यक्तींची व्यक्तिरेखा साकारणं सोपं नाही. ती व्यक्तिरेखा साकारायची म्हणजे त्या भूमिकेत उतरावं लागतं. त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. एखादं काल्पनिक पात्र साकारताना कलाकाराला खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र खऱ्या आयुष्यातलं एखादं पात्र साकारताना त्या कलाकाराची खरी कसोटी लागते. त्यामुळे या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमांमधून या सर्वच कलाकारांच्या अभिनायाची कसोटी लागेल यात शंका नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या