महेश मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान, पार पडली शस्त्रक्रिया

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. अलीकडेच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

महेश मांजरेकर मूत्राशयाच्या कर्करोगानं ग्रस्त होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश मांजरेकर आता घरी परतले आहेत. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

रिपोर्ट्सनुसार, महेश मांजरेकरांवर मूत्राशयाच्या कर्करोगावर १० दिवसांपूर्वी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर ते काही दिवस रुग्णालयात होते. हॉस्पिटलच्या एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, महेश यांच्यावर शस्त्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली आहे. ते आता बरे होत असून रुग्णालयातून घरी परतले आहेत.

महेश मांजरेकर यांनी १९९२ मध्ये 'जिवा सखा' या मराठी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मराठी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'प्लान', 'जिंदा', 'मुसाफिर', कांटे, 'दस कहानियां', 'वॉन्टेड', 'रेडी' आणि 'दबंग' अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.

महेश मांजरेकर केवळ अभिनेतेच नाही तर दिग्दर्शकही आहेत. त्यांनी 'आई', 'वास्तव', 'निदान' आणि 'विरुध'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे महेश एक उत्तम डान्सर देखील आहे, 2006 मध्ये 'झलक दिखला जा' या शोचे ते सेकंड रनरअप होते. २०१८ मध्ये त्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालनदेखील केलं होतं.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. बिग बॉसच्या पहिल्या दोन्ही पर्वांच्या सूत्रसंचालनाची धुरा मांजरेकरांनी पेलली होती. त्यांच्या अनोख्या शैलीला चाहत्यांची विशेष पसंतीही मिळाली आहे. पण त्यांची प्रकृती ठिक नसल्यानं बिग बॉसचं सुत्रसंचालन कोण करणार हे कळू शकलं नाही.


हेही वाचा

स्कॅम १९९२- हर्षद मेहता स्टोरीवरून सोनी पिक्चर्सवर गुन्हा दाखल

सैफ-करीनानं बांद्रामधलं घर दिलं भाड्यानं, 'इतकं' आहे घरभाडं

पुढील बातमी
इतर बातम्या