गेले काही काळ चित्रपटांसापूस दूर असणारा अभिनेता उदय चोप्रा सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टीव्ह असतो. तो नेहमी सामाजिक मुद्द्यावर मत मांडत असतो. मात्र यावेळी त्याने असं काही केलं ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. यावेळी त्याने गांजा ओढण्यास कायद्याने मान्यता मिळावी, अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
‘माझ्या मते भारतात गांजाला कायदेशीर परवानगी दिली पाहिजे. गांजा ओढणं हे आपल्या संस्कृतीचा भाग असून त्यासाठी कायदेशीर परवानगी द्यावी आणि त्यावर कर लावावा. त्यामुळे सरकारला चांगलं उत्पन्न मिळेल. शिवाय गांजा ओढल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होतील. इतकंच नव्हे तर गांजाचे वैद्यकीय फायदेही बरेच आहेत, असं ट्विट त्याने केलं.
उदय चोप्राच्या या ट्विटमुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. बॉलिवूडचा राहुल गांधी असं ट्विट करत त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. या ट्विटवर झालेल्या टीकेनंतरही तो गप्प बसला नाही. त्याने आणखी एक ट्विट केलं. त्यात तो म्हणाला, 'माझ्या ट्विटवर इतकं ट्रोल केलं. पण मी एक भारतीय नागरिक आहे. मला भारताची काळजी आहे.' पण तुमच्या विचारांना डावलण्याची माझी हिंमत नाही.'
नुकत्याच झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकीनंतरही उदयने ट्विट केलं होतं. त्याने यडुरप्पा यांनी घेतलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्याने लिहलं होतं की, "मी कर्नाटकच्या राज्यपालांबद्दल गुगलवर शोधलं. ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहे. मला असं वाटतं की आता आपलं काय होणार? हे आता सगळ्यांनाच माहीत आहे?' या ट्विटमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता.