अमिताभ बच्चन यांनी घेतलं लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२व्या वर्षी गानकोकिळेनं या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.

दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभूकुंजवर हजर आहेत. महानायक अमिताभ बच्चन त्यांची कन्या श्वेता बच्चनसह दीदींचे अंत्यदर्शन घेतले.

सचिन तेंडुलकर, आशा पारेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रविवार सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. सकाळी ८.१२ वाजता अवयव निकामी झाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.

८ जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४.३० वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.

त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.


हेही वाचा

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

डॉक्टरांनी सांगितलं लता दीदींच्या निधनाचं कारण

पुढील बातमी
इतर बातम्या