कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपल्या सोशल मीडियावर वॅक्स लाइव्ह इव्हेंटची एक झलक शेअर केली, यात त्यांनी कोरोनोशी लढा देत असलेल्या भारताला मदत करण्याचे आवाहन केलं आहे. या जागतिक कार्यक्रमाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये ७८ वर्षीय अमिताभ म्हणाले की, या प्राण घातक विषाणूविरूद्ध लढण्यासाठी जगानं भारताची मदत करावी.

अमिताभ यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून लसीचे महत्त्व यावर जोर दिला आहे. बच्चन यांनी लिहिलं की, लसीकरण हा कोरोनाला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणून सामील व्हा आणि ग्लोबल सिटीझनला  पाठिंबा द्या याची भारताला गरज आहे. कॉमेडी सेंट्रल, व्हायाकॉम 18, व्हीएच 1 आणि विझक्राफ्ट इंडियानं वॅक्स लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन केलं आहे, याचा उद्देश कोरोना विषाणूशी लढण्यासाठी जगाने एकत्र यावं, हा आहे.

या लाइव्ह इव्हेंटमध्ये सेलेना गोमेझ, प्रिन्स हॅरी आणि मेगन मॉर्केल, जेनिफर लोपेझ, बेन एफलेक हे सेलेब्स सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम ९ मे रोजी रात्री ८ ते ९ या वेळेत झाला तर त्याचे पुन्हा प्रसारण ११ मे रोजी होईल.

दरम्यान, अमिताभ यांनी दिल्लीतील कोविड सेंटरसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं की, ‘अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. अमिताभ हे मला रोज फोन करून विचारणा करत असतात.

त्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली. ‘तुम्ही पैशाची चिंता करू नका… जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करा! असं ते मला नेहमी सांगतात. त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे’ असं त्यांनी म्हटलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या