बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जुहू मार्गावरील प्रतीक्षा या प्रसिद्ध बंगल्याची संरक्षण भिंत मुंबई महापालिका पाडणार आहे. बिग बी यांचा प्रतीक्षा हा मुंबईतील पहिला बंगला आहे. संत ज्ञानेश्वर मार्ग रुंदीकरणासाठी प्रतीक्षा या बंगल्याची संरक्षण भिंत पाडली जाणार आहे. वास्तविक २०१७ मध्ये या संदर्भातील नोटीस बिग बी यांना दिली गेली होती मात्र त्यांनी नोटिसीला अद्यापी उत्तर दिलेलं नाही.
संत ज्ञानेश्वर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता ४५ फुटावरून ६० फुटी केला जाणार आहे. या रुंदीकरणात बिग बी यांचा बंगला आणि उद्योजक केवी सत्यमूर्ती यांचा बंगला अडथळा ठरत होते. सत्यमूर्ती यांनी पालिकेच्या नोटिसीला उत्तर देताना न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. पण पालिकेनं ही स्थगिती उठवून घेतली होती.
प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर तीन वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावानं मुंबई महानगरपालिकेनं भिंती तोडण्याची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती.
त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली.
प्रतिक्षा बंगलाच्या शेजारील इमारतींमधील लोकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन ते चार दिवसापासून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरचा रस्त्यावर रोड मॅपिंग आणि मार्किंग करत आहेत. त्यामुळे येणारा काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा