'झिरो' विरोधातील याचिकेवर ३० नोव्हेंबरला सुनावणी

अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' या चित्रपटाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 'झिरो' या चित्रपटामध्ये शाहरुख खानने कृपाण धारण केलं आहे. शाहरुखच्या या कृपाण धारणामुळे शिख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

सुनावणी ३० नोव्हेंबरला

न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सोमवारी ही याचिका सादर करण्यात आली आहे. न्यायालयातील वकील अमृतपालसिंह खालसा यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी निश्चित केली आहे.

याचिकेतून केली 'ही' मागणी

शिख संस्कृतीमध्ये कृपणाला विशेष स्थान असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. त्यामुळे कृपाण कोणीही धारण करू शकत नाही. हे धारण करण्याकरता काही धार्मिक विधी करणं महत्त्वाचं असतं, असा दावा देखील या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयानं सीबीएफसीला निर्देश देत चित्रपटातील अक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याचे र्निदेश द्यावेत, अशी मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे.

यांच्या विरोधात कारवाईची मागणी

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत शाहरुख खान सिनेमाच्या निर्मात्या गौरी खान, करुणा बडवाल, दिग्दर्शक आनंद एल. राय आणि रेड चिलीज प्रायव्हेट लिमिटेड आणि सिनेमाला सर्टिफिकेट देणाऱ्या सीबीएफसीलाही यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या