सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. 

५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने ३ मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे. जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिलं.

रजनीकांत हे १२ वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ.राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

जनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. दक्षिण भारतात चाहते रजनीकांत यांना देवाच्या स्थानी मानतात.

रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमवरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.


हेही वाचा -

शीतल-अभिजीतचं लव्ह साँग 'लंडनचा राजा...'

या' दिवशी अॅमेझॉनवर वेल डन बेबीचा खास प्रीमिअर

पुढील बातमी
इतर बातम्या