Movie Review : वास्तवाची जाणीव अन् व्यवस्थेला टोला

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी नेहमीच वास्तववादी सिनेमांना प्राधान्य दिलं आहे. त्यांचा मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर हा सिनेमा म्हणजे त्याच वाटेवरील पुढचं पाऊल आहे. एका साध्याशा गोष्टीवर वास्तववादी सिनेमा बनवताना त्यांनी समाज व्यवस्थेसोबतच जनतेलाही चिमटे काढण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला आहे. हा सिनेमाही तसाच काहीसा आहे. त्यामुळेच स्टारडमचं मोहजाळ नसूनही या सिनेमाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.

आंधळ्या कारभाराचं चित्रण

नेहमीच सरकारच्या वतीनं बऱ्याच घोषणा केल्या जातात. त्या राबवण्यासाठी प्रयत्नही केले जातात, पण आजही कित्येक ठिकाणी परिस्थिती 'जैसे थे' अशीच आहे. देशभर उघड्यावर शौचास मनाई असताना एखाद्या खेडेगावात नव्हे, तर चक्क मुंबईसारख्या महानगरीत कशा प्रकारे आंधळा कारभार सुरू आहे याचं चित्रणच मेहरांनी या सिनेमात केलं आहे. मुंबईत आजही लोक उघड्यावर नैसर्गिक विधी करत आहेत. यात त्यांची आणि प्रशासनाची किती चूक आहे हे दाखवण्याचा मुद्दा नसून आजही हे घडतंय हे लज्जास्पद असल्याचं सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

कंडोममागे एक रुपया 

या सिनेमात कन्हू (ओम कनोजिया) या लहानग्या मुलाच्या परिपक्व विचारांची कथा आहे. आई सरगमसोबत (अंजली पाटील) गांधी नगर या वस्तीत राहणारा कन्हू शाळेसोबतच पेपर टाकण्याचंही काम करत असतो. त्यासोबतच एका कंडोममागे एक रुपया मिळणार असल्यानं तो इव्हा (सोनिया अलबिझुरी) नावाच्या विदेशी स्त्रीनं दिलेले कंडोमही फ्रीमध्ये वाटतो. वस्तीत शौचालय नसल्यानं रिंगटोन (आदर्श भारती) आणि निराला (प्रसाद) या मित्रांसोबतच कन्हू पाईपलाईनवर शौचास जात असतो. स्त्रियांना मात्र काहीच पर्याय नसल्यानं अंधार झाल्यावर रात्री उशीरा त्या रेल्वे लाइनवर शौचास जात असतात. 

शौचालयासाठी संघर्ष

अशातच होळीच्या रात्री सरगमवर अतिप्रसंग ओढवतो. आपल्या आईसोबत घडलेल्या प्रसंगाचा धक्का बसलेला कन्हू तिच्यासाठी बांबू आणि साडीच्या सहाय्यानं शौचालय बनवतो, पण ते एकाच पावसात वाहून जातं. त्यानंतर तो पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतो. पण वस्तीच अनधिकृत असल्यानं शौचालय बांधताच येणार नसल्याचं उत्तर त्याला मिळतं. तिथूनच त्याला पंतप्रधानांना पत्र पाठव असं सांगितलं जातं. कन्हूच्या भोळ्या मनावर ते वाक्य इतकं ठळकपणं उमटतं की, तो थेट पंतप्रधानांना पत्र लिहतो. त्याचं पुढं काय होतं ते या सिनेमात आहे.

महिलांवरील अत्याचार

शौचास गेलेल्या स्त्रीचा विनयभंग, तिच्यावर अत्याचार होणं अशा प्रकारच्या घटनांना आजही आळा बसलेला नाही. सरकारनं उघड्यावर शौचास मनाई केल्यानंतर आज बऱ्याच गावांमध्येही शौचालयं बांधली गेली आहेत हे जरी सत्य असलं तरी अनधिकृत वसाहतीच्या नावाखाली आजही काही शहरांमध्ये शौचालयासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित राहिले आहेत. हा आकडा थोडा थोडका नसून जवळपास ३०० मिलियन इतका आहे. यातूनच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण कमी होत नसल्याचंही या सिनेमात अधोरेखित करण्यात आलं आहे.

स्वावलंबी व्यक्तींची कथा

या सिनेमाची कथा बरंच काही सांगणारी आहे. शौचालयाच्या मुद्द्यासोबतच इतरही मुद्द्यांवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. यात कंडोमचा वापर, पाणी टंचाई, बालमजूरी, विधवा विवाह यांचाही समावेश आहे. सिनेमा सुरू झाल्यावर कथानक काहीशा संथ गतीनंच पुढे सरकतं, पण या सिनेमाचा हुक असलेल्या घटनेनंतर मात्र गतीमान होतं. त्यामुळं उत्कंठाही वाढते. या सिनेमात पुन्हा एकदा झोपडपट्टी दाखवण्यात आली असली तरी त्यात तिथली गरीबी नसून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या व्यक्तींची कथा आहे.

गलिच्छपणाऐवजी मुद्द्यांवर भर 

'अरे जा रे हट नटखट...' या 'नवरंग' सिनेमातील गाण्यातील सिनेमॅटोग्राफी सुंदर असली तरी हे ओरिजनल गाणं ऐकेपर्यंत श्रवणीय वाटतं. पण त्यातील रिक्रिएटेड भाग मूळ गाण्याच्या सौंदर्याला हानी पोहोचवणारा आहे. वास्तववादी लोकेशन्सवर केलेलं चित्रीकरण मनमोहक आहे. झोपडपट्टीतील कथा मांडताना तिथल्या गलिच्छपणाऐवजी त्यांच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. यासाठी मेहरा आणि त्यांच्या टिमनं घेतलेली मेहनत पडद्यावर पाहायला मिळते. इतर तांत्रिक गोष्टीही चांगल्या आहेत.

ओमचा कमालीचा अभिनय 

सर्वच कलाकारांचा अभिनय अफलातून आहे. कन्हूच्या भूमिकेत ओम कनोजियानं कमालीचा अभिनय केला आहे. आपण कोणतीही भूमिका ताकदीनं करू शकतो हे अंजली पाटीलनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ग्लॅमरस भूमिकांपेक्षा वास्तववादी भूमिकांमध्येच ती जास्त शोभून दिसते. तिचा कणखरपणा आणि लुक या भूमिकेसाठी साजेसा वाटतो. मकरंद देशपांडेनं छोटीशी भूमिकाही चांगल्या प्रकारे साकारली आहे. अतुल कुलकर्णीचा परफॅार्मंस गेस्ट अॅपिरियन्समध्येही लक्षात राहतो. आदर्श भारती आणि प्रसाद या लहान मुलांनीही छान काम केलं आहे. याशिवाय रसिका आगाशे, नितीश वाधवा, सोनिया अलबिझुरी, नचिकेत पूर्णपात्रे आदी कलाकारांची कामंही छान झाली आहेत.

वास्तवाची जाणीव 

एका साध्याशा कथेभोवती गुंफलेलं हे भावविश्व वास्तवाची जाणीव करून देणारं आहे. वास्तववादी लोकेशनवर चित्रीत झालेल्या सिनेमातील कलाकारांचा तितकाच वास्तवदर्शी अभिनय मनाला भावतो.  त्यामुळंच वास्तवाची जाणीव करून देताना सिस्टीमला मारलेला हा टोला एकदा तरी पहायला हवा.

.............................

हिंदी चित्रपट : मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर

दिग्दर्शक/निर्माता : राकेश ओमप्रकाश मेहरा

लेखक : मनोज मेरता, राकेश ओमप्रकाश मेहरा, हुसेन दलाल

कलाकार : अंजली पाटील, ओम कनोजिया, मकरंद देशपांडे, रसिका आगाशे, अतुल कुलकर्णी, आदर्श भारती, प्रसाद, नितीश वाधवा, सोनिया अलबिझुरी, नचिकेत पूर्णपात्रे


पुढील बातमी
इतर बातम्या