मुंबईत उभारणार भव्य बॉलिवूड संग्रहालय!

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • बॉलिवूड

मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातल्या चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. हे लक्षात घेता मुंबईत भव्य असं बॉलिवूड संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वांद्रे आणि जुहू परिसरात जागा मिळण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

पर्यटन विकासाच्या दृष्टीने झाली चर्चा

पर्यटन विषयाच्या अनुषंगाने नियम २९३ अन्वये विधानसभेत सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेस उत्तर देताना रावल बोलत होते. चर्चेत विधानसभेतील अनेक सदस्यांनी सहभाग घेत महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या. रावल यांनी या सर्व सूचना लक्षात घेऊन मंगळवारी विधानसभेत सविस्तर उत्तर दिलं.

काय म्हणाले रावल?

रावल म्हणाले, 'बॉलिवुडला मोठा इतिहास आहे. हा इतिहास उजागर होण्याच्या दृष्टीने, तसेच देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईत टूरिस्ट अट्रॅक्शन निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत हे संग्रहालय उभारण्यात येईल, यात चित्रपटसृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या सुवर्णकाळापर्यंतचा सर्व कालावधी दर्शवण्यात येईल.

अगदी सुरुवातीच्या अभिनेत्यांपासून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते आजपर्यंतच्या अभिनेते, अभिनेत्री, गायिका लता, गायक रफी, किशोर यांच्यापासून चित्रपटसृष्टीला वैभवशाली बनवण्यात योगदान दिलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञांचा इतिहास या संग्रहालयात उभा करू. जुन्या काळातील वेशभूषा, पोस्टर्स, चित्रीकरणाचे साहित्य, कलासेट, फोटोगॅलरी, कॅमेरे अशा सर्वांचा या संग्रहालयात समावेश करू. चित्रपटप्रेमी, अभ्यासकांना उपयोग होण्याबरोबरच पर्यटकांसाठीही विशेष आकर्षण ठरेल असं संग्रहालय निर्माण करू', असं ते म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या