शाहरूखचा 'झीरो' वादात; किरपानचं दृश्य हटवण्याची चरणसिंग सप्रांची मागणी

बाॅलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान याचा आगामी बहुप्रतिक्षित 'झीरो' चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात रंगला आहे. या चित्रपटात किरपानच्या दृश्याद्वारे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याचं म्हणत देशभरातून या चित्रपटाला विरोध होत असतानाच मुंबईतही या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे.

काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहित यासंबंधी तक्रार केली आहे. तर किरपानचं दृश्य चित्रपटातून हटवावं अशी आपली मागणी असल्याची माहिती सप्रा यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.

शीख नसताना किरपान धारण 

झीरो चित्रपटात शाहरूखला किरपान धारण केलेलं दाखवण्यात आलं आहे. मात्र, तो चित्रपटात शीख धर्मीय दाखवलेला नाही. किरपान हे शीख धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जात आणि ते धारण करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया असते. असं असताना झीरो चित्रपटात शाहरूखने किरपान धारण केलं असून त्याद्वारे तो थट्टामस्करी करताना दिसत असल्याचं म्हणत सप्रा यांनी या दृश्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

...तर प्रदर्शन रोखू

या संदर्भात सप्रा यांनी पोलिसांना पत्र लिहिलं असून शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्याचं म्हणत या पत्राद्वारे निर्मिते आणि दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर हे दृश्य काढण्यात आलं नाही तर या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याचा इशारा शीख धर्मियांकडून देण्यात आला आहे. 


हेही वाचा - 

'रंगीला राजा' सेन्साॅरच्या कात्रीत, निहलानींची कोर्टात धाव


पुढील बातमी
इतर बातम्या