बँकांच्या सुट्टीचा व्हायरल मेसेज खोटा!

सध्या सोशल मीडियावर आणि काही माध्यमांध्ये देशभरातील बँका गुरूवार २९ मार्चपासून सलग ५ दिवस सुट्टीवर जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. परंतु हा मेसेज चुकीचा असून बँका सलग बंद राहणार नाहीत, असं बँकिंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय मेसेज फिरतोय?

व्हाॅट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्कींग साइटवर प्रामुख्याने गुरूवार २९ मार्चपासून सलग ५ दिवस म्हणजे २ एप्रिलपर्यंत बँका बंद राहतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. २९ मार्चला महावीर जयंती, ३० मार्चला गुड फ्रायडे, ३१ मार्चला क्लोजिंग डे, १ एप्रिलला रविवार आणि २ एप्रिलला आर्थिक वर्ष समाप्ती (इयर क्लोजिंग) असल्याने बँका बंद राहतील, असं म्हटलं आहे.

सलग ५ दिवस सुट्टी असल्याने बँक ग्राहकांनी आपापले आर्थिक व्यवहार गुरूवारच्या आत उरकून घेण्याचा सल्लाही या मेसेजमध्ये देण्यात आला आहे. एवढंच नाही, तर विविध बँकांच्या एटीएम सेवेवरही या सलग सुट्ट्यांचा परिणाम होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे बँक ग्राहक गोंधळात पडले आहेत.

सत्यस्थिती काय?

बँका गुरूवारपासून सलग ५ दिवस बंद राहतील, या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनांचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितलं.

तर, बँका केवळ गुरूवार आणि शुक्रवारीच अनुक्रमे महावीर जयंती आणि गुड फ्रायडे निमित्ताने बंद राहतील. रविवार १ एप्रिल रोजी सरकारी कर वसुलीकरीता काही बँकेच्या ठराविक शाखांमध्ये काम सुरू राहील. शनिवार ३१ मार्च रोजी महिन्यातील पाचवा शनिवार असल्याने या दिवशी बँका सुरू राहतील. त्यानंतर २ एप्रिलला सोमवारी बँकांच्या वार्षिक ताळेबंदाचं काम असल्याने या दिवशी बँका बंद राहतील, अशी माहिती उटगी यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या