कॅ. अमोल यादव यांना विमाननिर्मितीसाठी पालघरमध्ये जागा, एमआयडीसीसोबत करार

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • व्यवसाय

महाराष्ट्र सरकारच्या वतीने एमआयडी (MIDC) ने कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रा. लि. (Thrust Aircraft Pvt Ltd.) सोबत सोमवारी विमाननिर्मितीचा कारखाना उभारण्यासंदर्भातील सामंजस्य करार केला. या 'एमओयू'मुळे भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारे कॅ. यादव यांचं स्वप्न लवकरच सत्यात उरणार आहे.

कुठे मिळणार जमीन?

संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमाननिर्मितीचा देशातील पहिला कारखाना महाराष्ट्रात व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यानुसार कॅ. अमोल यादव यांना विमाननिर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी पालघर इथं जमीन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. यादव यांनी मुंबईतील 'मेक इन इंडिया' सप्ताहात आपलं विमान सादर केलं होतं. त्यामुळे एका मराठी तरुणाची वाटचाल प्रत्यक्ष विमाननिर्मितीच्या दिशेने सुरू झाली आहे.

३५ हजार कोटींची गुंतवणूक

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या कराराप्रमाणे कॅ. अमोल यादव यांना विमाननिर्मितीसाठी पालघर इथं जमीन उपलब्ध करून देण्याचं MIDC ने मान्य केलं आहे. या प्रकल्पात सुमारे ३५००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून यातून १० हजार जणांना रोजगार मिळेल, असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत अमोल यादव ?

मूळचे साताऱ्याचे रहिवासी असणाऱ्या अमोल यांनी तब्बल १७ वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय बनावटीचं विमान बनवलं आहे. मुंबईतील रहिवासी इमारतीच्या गच्चीवरच त्यांचे हे प्रयोग सुरू होते. मुंबईतील ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्यांचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा जगासमोर आला.

पहिलाच स्वदेशी कारखाना

त्यानंतर अनेक देशांनी, राज्यांनी, कंपन्यांनी त्यांच्यासमोर विमान बनविण्याचे प्रस्ताव ठेवले. पण महाराष्ट्रातच कंपनी उभारायचं त्यांचं स्वप्न होतं. अमोल यादव यांचा महाराष्ट्रात सुरू होणारा कारखाना भारतातील पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असेल. २० नोव्हेंबर रोजी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं होतं. त्यांना याबाबतचं पत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलं होतं.

हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण असून महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याचं माझं स्वप्न यामुळे लवकरच सत्यात उतरणार आहे. माझ्या या कारखान्यातून आपल्याला संपूर्ण भारतीय बनावटीचं विमान, तर मिळेलच शिवाय १०,००० हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

- कॅप्टन अमोल यादव

पुढील बातमी
इतर बातम्या