डिझेल तब्बल ४० टक्क्यांनी महागलं

डिझेलवर अवलंबून असणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. डिझेलच्या किंमतीत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती ४० टक्क्यांनी वाढल्या असल्याने डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळं आता वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसंच, घाऊक खरेदी करणाऱ्या कंपन्या, आस्थापने, उद्योग यांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण त्यांना डिझेल खरेदी करताना आता लीटरमागे २५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

घाऊक खरेदी करणारे बस ऑपरेटर्स, मॉल्स यांच्यासारखे मोठे वापरकर्ते नेहमीप्रमाणे तेल कंपन्यांना थेट ऑर्डर देत नसून, इंधन खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याने पेट्रोल पंपावरील विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना नुकसान सहन करावं लागत आहे.

सर्वात जास्त नुकसान नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या खासगी किरकोळ विक्रेत्यांना बसला आहे, ज्यांनी आतापर्यंत विक्रीत वाढ होऊनही प्रमाण कमी करण्यास नकार दिला आहे. घाऊक वापरकर्त्यांना विकल्या जाणार्‍या डिझेलची किंमत मुंबईत १२२.०५ रुपये प्रति लीटर झाली आहे. पेट्रोल पंपावर हाच दर ९४.१४ रुपये इतका आहे. दिल्लीतील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ८६.६७ रुपये मोजावे लागत असताना घाऊक खरेदीसाठी हा दर ११५ रुपये आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या