खाद्यतेलांच्या दरांत २८ ते ३५ टक्के वाढ

युक्रेन-रशिया युद्ध व त्याचवेळी इंडोनेशिया सरकारच्या आठमुठ्या धोरणाचा देशाच्या खाद्यतेल आयातीला जबर फटका बसला आहे. तेलाच्या दरांत २८ ते ३५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या आर्थिक खर्चात आता वाढ होणार आहे.

दिवसेंदिवस खाद्यतेलांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसंच, भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. पण मागणीच्या जेमतेम १५ टक्के तेल उत्पादन भारतात होते. त्यामुळेच भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते.

एकूण आयातीत ६० टक्के पामतेल किंवा तेलबिया इंडोनेशियाहून तर १८ ते २२ टक्के सूर्यफूल तेल किंवा तेलबियांची आयात युक्रेन आणि रशियाहून होते. पण सध्या या दोन्ही आयातीचे गणित बिघडले आहे.

खाद्यतेल क्षेत्रातील आयातदारांनुसार, युक्रेन व रशियातून अखेरची आयात १५ फेब्रुवारीला झाली. त्यानंतर तेथून मुंबईत किंवा भारताच्या कुठल्याच बंदरावर तेलाची आयात झालेली नाही. इंडोनेशियासंबंधी तेल आयातीचा वाद जानेवारीपासूनच सुरू असून तेव्हापासूनच आयात कमी झाली होती.

या सर्व स्थितीमुळे देशांतर्गत खाद्यतेल आता चांगलेच महाग होत आहे. २ आठवडे आधी १३० ते १३५ रुपये प्रति लीटर असलेले पामतेल आता १४५ रुपयांच्या घरात गेले आहे. १४५ रुपयांचे सूर्यफूल तेल १५० ते १५५ रुपये, १४५-१४८ रुपयांचे सोयाबीन तेल १५५-१६० रुपयांवर तर शेंगदाणा तेल २०० रुपयांवर आणि एरव्ही अत्यल्प मागणी असलेले राइसब्रान तेलदेखील आता १५० रुपये प्रति लिटरवर गेले आहे.

दरवाढ झाल्याने ग्राहकांकडून खरेदी वाढली आहे. परिणामी अनेक सुपर मार्केट, मॉल्समध्ये एकावेळी कमाल पाच लिटर तेल खरेदी करण्याचे निर्बंध आणले आहेत. तर काही किराणा दुकानदारांकडील सूर्यफूल तेलाचा साठा संपला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या