ईपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल नाही

पीएफवर मिळणाऱ्या व्याज दरामध्ये यंदा कोणताही बदल केलेला नाही. या आर्थिक वर्षातही पीएफवर ८.५ टक्के व्याज मिळणार आहे.  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या श्रीनगर बैठकीत गुरूवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने ईपीएफओच्या देशातील ६ कोटी सदस्यांना  मोठा दिलासा दिला आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  होते. तर अपूर्व चंद्रा, सचिव (कामगार आणि रोजगार) हे उपाध्यक्षस्थानी तसंच सदस्य सचिव सुनील बर्थवाल आणि केंद्रीय पी एफ आयुक्त या बैठकीला उपस्थित होते.  

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रत्येक आर्थिक वर्षासाठी पीएफ रकमेवर व्याज दर जाहीर करते. गेल्या वर्षी मार्चमध्ये ईपीएफओने व्याजदर कमी करून ८.५ टक्क्यांवर आणला. 

बोर्डाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. ईपीएफओच्या वेगवेगळ्या स्रोतांच्या गुंतवणूक, त्यावरील उत्पन्न आणि कोविड यांच्या परिणामावर आधारित या समितीने व्याजदरासाठी आढावा अहवाल सादर केला. व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाने अद्याप घेतलेला नाही. ईपीएफओ बोर्ड आता आपल्या शिफारशी वित्तमंत्र्यांकडे पाठवणार आहे. त्यानंतरच त्यावर निर्णय होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या