पेटीएमची पेमेंट बँक सुरु, 4 टक्के मिळणार व्याज

मोबाइल वॉलेटची सुविधा देणाऱ्या पेटीएमने बुधवारी आपली पेमेंट बँक सुरू केली. ऑनलाईन व्यवहारासाठी ही बँक कोणतेही शुल्क आकारणार नसून ग्राहकाला खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याचीही आवश्यकता नसेल. बँकेने आपल्या ग्राहकांना खात्यातील जमा रकमेवर 4 टक्के दराने व्याज देण्याचे निश्चित केले आहे.

एकाबाजूला एअरटेल पेमेंट बँक ग्राहकांना खात्यातील रकमेवर 7.1 टक्के व्याज देत असताना पेटीएमच्या पेमेंट बँकेचे 4 टक्के व्याज तुलनेत बरेच कमी आहे. इंडिया पोस्ट, एयरटेलनंतर पेमेंट बँक सुरू करणारी पेटीएम देशातील तिसरी कंपनी आहे. पेमेंट बँकेत खाते सुरू करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या खात्यात 25 हजार रुपये जमा असल्यास 250 रुपयांचा परतावा मिळेल. पेटीएम पेमेंट्स बँक खाते सुरूवातीला केवळ-आमंत्रण तत्त्वावर उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात, कंपनी आपले कर्मचारी आणि सहकाऱ्यांसाठी ‘बीटा बँकिंग अॅप्लिकेशन’ तयार करेल.

याबाबत पेटीएम पेमेंट बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने आम्हाला बँकेचे एक नवीन मॉडेल बनविण्याची संधी दिली आहे. आमच्या सर्व ग्राहकांचे पैसे सरकारी बाँडमध्ये सुरक्षित राहतील आणि देशाच्या प्रगतीसाठी ते अतिशय फायद्याचे ठरेल. या ठेवींना सुरक्षेचा कोणताही धोका नसेल.

पेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती यांनी सांगितले की, आम्हाला देशातील सर्वात विश्वसनीय आणि ग्राहकांना अनुकूल ठरणारी बँक बनवायची आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून 2020 पर्यंत 50 कोटी ग्राहक मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या