आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द; आरबीआयचा निर्णय

आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम) आणि एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) द्वारे पैसे पाठवण्यासाठी आता कसलंही शुल्क लागणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आरटीजीएस  अाणि एनईएफटीसाठी लागणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामुळे बँका देखील आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आरबीआयने गुरूवारी आढावा पतधोरण बैठकीवेळी हा निर्णय घेतला.

बँकांना निर्देश देणार

बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटी शुल्क कमी करून याचा फायदा आपल्या ग्राहकांना द्यायला हवं असं आरबीआयने म्हटलं आहे. याबाबतचे निर्देश बँकांना एका आठवड्यात मिळतील असंही आरबीआयने सांगितलं आहे. आरटीजीएस आणि एनईएफटी २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरटीजीएस व्यवहारासाठी २५ रुपये तर ५ लाख रुपयांहून अधिक व्यवहारासाठी ५० रुपये शुल्क आकारत होती.

बँक ग्राहकांना लाभ?

एनईएफटीसाठी बँका १० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर २.५० रुपये, १० हजार रुपये ते १ लाख रुपयांपर्यंत ५ रुपये, १ लाख ते २ लाखांपर्यंतच्या रकमेवर १५ रुपये आणि २ लाखांवरील रकमेवर २५ रुपये शुल्क आकारत होत्या. आरबीआयच्या निर्णयाचा फायदा आता बँका आपल्या ग्राहकांना देतात की नाही हे आगामी काळात दिसून येईल. 


हेही वाचा  -

RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात


पुढील बातमी
इतर बातम्या